MumbaiCrimeUpdate : ऐकावे ते नवलंच…”तिने ” “त्याचा” व्हिडीओ केला आणि आणि ३७ हजार उकळले !!

नेहमी आपण पुरुष आरोपीने महिलांना ब्लॅकमेल केल्याचे गुन्हे घडलेले पाहतो आणि ऐकतो पण या घटनेत चक्क एका महिलेनं एका तरुणाला व्हॉट्सअॅप कॉल करून त्याचा नग्न व्हडिओ शूट केला आणि नंतर त्याला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ३७ हजार रुपयांना गंडवल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे वैतागलेल्या तरुणाने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत. हि महिला गुजरातमधील असल्याचा संशय आहे. ठाणे जिल्ह्यातील भायंदर भागात ही घटना घडली असून फिर्यादी तरुणाचे वय २५ वर्ष आहे. या तरुणाला व्हॉट्सअॅप कॉल करून त्याचा नग्न व्हडिओ शूट करून हा न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल केली.
या विषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भायंदर परिसरात राहणाऱ्या पीडित तरुणाला गेल्या महिन्यात एका अज्ञात महिलेनं व्हॉट्सअॅप कॉल केला. नंतर संबंधित महिला ही तरुणाला वारंवार कॉल करू लागली. एके दिवशी महिलेनं तरुणाला व्हिडीओ कॉल करून न्यूड होण्यास सांगितलं. महिलेनं नकळत तरुणाचा न्यूड व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतला. आणि दुसऱ्याच दिवशी तरुणाला त्याचा न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याला ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. पीडित तरूण एका खासगी संस्थेत नोकरी करतो.
दरम्यान आरोपी महिला वारंवार कॉल करून तरुणाला पैशांसाठी धमकावत होती. पैसे दिले नाही तर सुरतमध्ये (गुजरात) न्यूड व्हिडिओ व्हायरल करेन, अशी महिला धमकी देत होती. फोन करणाऱ्या महिलेनं स्वत:ला सीबीआय एजेंट सांगितलं होतं. कोरोना काळात वर्क फॉर्म होम करणाऱ्या पीडित तरुणानं आरोपी महिलेला ३७ हजार रुपये दिले. आरोपी महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणानं अखेर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.