UttarPradeshNewsUpdate : उत्तर प्रदेशात पुन्हा “मॉबलिंचिंग” , क्षुल्लक कारणावरून वृद्ध व्यक्तीला ठार मारले…

उत्तर प्रदेशाच्या उन्नाव जिल्ह्यात मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. एका महिलेला सायकलने धडक दिल्यानंतर जमावाने ६० वर्षीय व्यक्तीची मारहाण केली. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोटारिया गावात ही घटना घडली. या घटनेतील दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध चालू आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते सायकलीवरून जात असताना एका महिलेला धडक लागली. ती महिला रस्त्याच्या कडेला पडली. तिच्यासोबत असलेल्या कुटुंबीयांची आणि रामेश्वर यांची रस्त्यावरच बाचाबाची झाली. काही वेळातच तिथे जमाव एकत्रित आला. त्यांनी रामेश्वर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाने केलेल्या मारहाणीत रामेश्वर गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेले असता, तिथे त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. रामेश्वर यांच्या मुलाने सांगितले की, माझ्या वडिलांना जमावाने मारहाण केल्यानंतर त्यांना पाण्याच्या डबक्यात बुडवले. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. निर्दयी लोकांनी माझ्या वडिलांची हत्या केली, असे तो म्हणाला.
दरम्यान मुलाने दिलेल्या माहितीनुसार वडिलांना मारहाण होत असताना, गावातील काही व्यक्ती त्यांच्या बचावासाठी धावले. मात्र, त्यांनाही जमावाने धमकावले. त्यानंतर गावातील काही नागरिकांना मदतीसाठी बोलावले. ते येईपर्यंत सगळं काही संपलं होतं. माझे वडील रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले होते, असे त्यांच्या मुलाने सांगितले. माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक व्हावी, असेही तो म्हणाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींची ओळख पटवण्यात आली असून, लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.