MarathwadaNewsUpdate : शतायुषी डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरल्याने उसळली भक्तांची प्रचंड गर्दी

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये राष्ट्रसंत शतायुषी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरल्याने भक्तांची प्रचंड गर्दी उसळली , मात्र शिवाचार्य महाराज आज शुक्रवारी समाधी घेणार नसल्याचे त्यांच्या आश्रमाकडून स्पष्ट करण्यात आले. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा आज सकाळपासून पसरली होती. त्यावरून डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या भक्तांनी भक्तीस्थळाकडे धाव घेतली. त्यामुळे हजारो भक्तांच्या गर्दीमुळे आरोग्य व कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलीस व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून आहेत. डॉ शिवलिंग शिवाचार्य हे लिंगायत समाजाचे धर्मगुरु आहेत. फक्त महाराष्ट्रातच नव्हते, तर राज्याबाहेरही शिवाचार्य महाराज यांना मानणारा मोठा भक्तजन आहे.
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे ख्यातीप्राप्त महाराज असून त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर आहे . एप्रिल २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती तेंव्हा त्यांना वंदन करून मोदींनी आपली सभा सुरु केली होती. २०१७ मध्ये त्यांचा भव्य जन्मशताब्दी सोहळा झाला होता. राष्ट्रीय स्तरावर त्यांना राष्ट्रसंत म्हंणून मान्यता असून त्यांच्याविषयी संतांमध्ये आदराची भावना आहे.
विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या कुठल्याही नियमांची काळजी न करता , डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या भक्तजनांनी गर्दी केल्याने चिंता व्यक्त केली जात होती. लातुरात आतापर्यंत सात हजारापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे वय १०० वर्षांपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे. दरम्यान महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरल्याने त्यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आश्रमाबाहेर जमा झाला होता. यावेळी शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे दर्शन घेण्याची ओढ भक्तांना लागली होती. अहमदपूर इथल्या ‘भक्तीस्थळ’ या त्यांच्या आश्रमात समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. मात्र आज महाराज समाधी घेणार नसल्याचे त्यांच्या आश्रमाकडून स्पष्ट करण्यात आले आणि गर्दी कमी झाली.
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार असल्याच्या अफवेने काल रात्रीपासून अहमदपूर-नांदेड रस्त्यावरच्या ‘भक्तीस्थळ’ इथं भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल संदेशात १०४ वर्षीय डॉ. शिवलिंग शिवाचार्यांनी ‘माझी प्रकृती चांगली असून काही काळजी करण्याचे कारण नाही. तुमची भक्ती व तुमची श्रद्धा माझे आयुष्य वाढवणारी आहे. तुम्ही भक्ती करा व मला व्यवस्थित रितीने जगू द्या’, असे आवाहन भक्तांना उद्देशून केले. मात्र, हा संदेश कधी दिला हे स्पष्ट झाले नाही. महाराजांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून नातेवाईकांशी संवाद साधताना आपला उत्तराधिकारी नियुक्ती व जिवंत समाधीबाबत ते बोलताना दिसते. यामुळे भाविकांत प्रचंड अस्वस्थता, गोंधळ व संभ्रमाचे वातावरण आहे.