MaharashtraNewsUpdate : GoodNews : कोरोना काळात मुद्रांक शुल्क कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आज झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयायानुसार ३१ डिसेंबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ५ टक्क्यांहून २ टक्क्यांपर्यंत मुद्रांक शुल्क कमी केले जाणार आहे. तर १ जानेवारीपासून ३१ मार्चपर्यंत ३ टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. रियल इस्टेट मार्केटला चालना देण्यासाठी सरकारने हा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला असून राज्यातील अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या या निर्णयाचा बांधकाम क्षेत्राला फायदा होणार आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अभिहस्तांतरणपत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर दि. १ सप्टेंबर, २०२० पासून ते दि.३१ डिसेंबर, २०२० या कालावधीकरिता ३ टक्केने तर दि.१ जानेवारी, २०२१ ते दि.३१ मार्च, २०२१ या कालावधीकरिता २% ने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील ८ महानगरपालिका व ७ नगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता.
राज्याच्या शहरी भागातील आरोग्य सेवेसाठी 7 नियमित पदांच्या निर्मितीस मान्यता. संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक या पदांचा समावेश.
राज्यातील मच्छिमारांना मिळणार विशेष सानुग्रह अनुदान.
वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांना १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी करमाफी.
टाळेबंदीमुळे अतिरीक्त होणाऱ्या दूधापैकी प्रतिदिन १० लाख लिटर दुध स्वीकारणे आणि रुपांतर योजना ऑक्टोबरपर्यंत राबविण्यास मान्यता.
नाशिक जिल्ह्यातील काष्टी (ता.मालेगाव) येथे कृषि विज्ञान संकुल निर्मितीस मान्यता. याअंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांची होणार स्थापना.
कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल.