MaharashtraNewsUpdate : राज्यात दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन , प्रत्येक सदस्यांची होणार कोरोना टेस्ट

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दोन वेळा पुढे ढकलण्यात आलेले विधीमंडळाचे झाले नसल्याने आता मात्र पावसाळी अधिवेशन दि. ७ आणि ८ सप्टेंबरला होत असल्याचे वृत्त आहे . मात्र या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या आमदारांना अटी आणि शर्तींसचा सामना करावा लागणार आहे. या अधिवेशनासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीनुसार, सभागृहासह प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीत देखील शारीरिक अंतराचे नियम पाळून माजी सदस्यांची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिवेशनाअगोदर एक दिवस म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे.
अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांना करोनापासून सुरक्षेसाठी सुरक्षा किट देण्यात येणार आहे. यामध्ये मास्क, हँडग्लोव्ह्ज आणि सॅनिटायझरचा समावेश असेल. सदस्यांच्या स्वीय सचिवांना सभागृहात प्रवेश मिळणार नाही. मात्र, त्यांची स्वतंत्र व्यवस्था सभागृहाबाहेर करण्यात येणार आहे. सदस्यांच्या वाहनचालकांची देखील बसण्याची तसेच नाश्ता, चहापाण्याची स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. इतर आजार असलेल्या सदस्यांना त्यांच्या पक्ष गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना देण्यात येणार आहेत.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठका आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकांमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, संसदीय कामकाजमंत्री ॲड. अनिल परब, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित होते. या बैठकांमध्ये कोविड परिस्थितीत सुरक्षाविषयक मापदंडांचे पालन करुन अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्याबाबत चर्चा झाली.
या अधिवेशनात शोक प्रस्तावावर चर्चा, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयक यावर चर्चा घेण्यात येतील. यामध्ये ७ शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा समावेश असेल, अशी माहिती विधानमंडळ सचिव ॲड. राजेंद्र भागवत यांनी यावेळी दिली. कामकाज सल्लागार समिती बैठकांना विधानसभा सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, ॲड. आशिष शेलार, अमिन पटेल, सुनील प्रभू, विधान परिषद सदस्य सर्वश्री डॉ. रणजीत पाटील, अशोक ऊर्फ भाई जगताप, विजय ऊर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, कपील पाटील आदी उपस्थित होते.