MaharashtraNewsUpdate : ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीच्या मानवी परीक्षणाला आजपासून पुण्यात सुरुवात

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीच्या मानवी परीक्षणाला पुण्यात सुरुवात होणार असल्याचे वृत्त असून उद्या बुधवारपासून ही चाचणी भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. मानवी चाचणीसाठी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने देशभरात निवडलेल्या १७ संस्थांमध्ये भारती विद्यापीठाचा समावेश होतो. जगभरातील तज्ज्ञांचे लक्ष या चाचणीकडे लागले असून ही दुसऱ्या टप्प्यातली चाचणी आहे. प्रारंभी ५ जणांवर या लसीचा प्रयोग करण्यात येणार आहे. या पाचही जणांच्या कोविड आणि इतर टेस्ट करण्यात येणार असून त्या निगेटिव्ह आल्या तरच त्यांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संजय लालवानी यांनी दिली.
दरम्यान या चाचणीसाठी १८-९९ या वयोगटातल्या ३०० ते ३५० जणांची निवड करण्यात आली आहे. ही लस देण्यात आल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात याचा सविस्तर अभ्यास करण्यात येणार आहे. पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट सोबत ऑक्सफर्डने करार केला असून या लसीचे उत्पादनही पुण्यातच होणार आहे. या लशीच्या पहिल्या क्लिनिकल ट्रायलचा रिझल्ट समोर आला आहे आणि या लशीचा सकारात्मक परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कोरोनावर शोधलेल्या ChAdOx1 nCoV-19 लशीची मानवी चाचणी झाली होती. त्याचे परिणाम जुलै महिन्यात जाहीर करण्यात आले. ते परिणाम सकारात्मक असून शास्त्रज्ञांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जगप्रसिद्ध लॅन्सेट मासिकात याबाबतचा एक अहवाल जाहीर झाला आहे. त्यात ते निष्कर्ष देण्यात आले आहेत. या औषधाचे कुठलेही घातक परिणाम आढळून आलेले नाहीत. त्याचबरोबर प्रतिकार शक्तीही वाढल्याचं दिसून आल्याची माहिती देण्यात आली आहे. या मुळे अँटिबॉडीज आणि पांढऱ्या पेशींची वाढ झाल्याचंही आढळून आलं आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होते. हे परिमाण सकारात्मक असले तरी आणखी काही चाचण्यांची गरज असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.