न्यायालय अवमान प्रकरण : प्रशांत भूषण आपल्या भूमिकेवर तर सर्वोच्च न्यायालय आपल्या भूमिकेवर ठाम , सुनावणी संपली , निकाल राखून ठेवला

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील प्रश्न भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकऱणी दोषी ठरवण्यात ठरविण्यात आल्यानंतर त्यांना आपल्या कृतीवर माफी मागण्यासाठी न्यायालयाने तीन दिवसांचा वेळ दिला खरा पण प्रशांत भूषण यांनी आज पुन्हा माफी मागण्यास नकार दिला . त्यावर सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी त्यांना समज देऊन सोडलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान प्रशांत भूषण यांच्या शिक्षेसंबंधी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी “जर तुम्ही एखाद्याला दुखावत असाल तर चूक मागण्यात गैर काय ? अशी विचारणा करीत “अजून किती काळ यंत्रणेला हे सहन करावं लागणार आहे? मी येत्या काही दिवसांत निवृत्त होत आहे. तुम्ही किंवा इतरांनी माझ्यावर हल्ला करणं योग्य आहे का ? जर तुम्ही एखाद्याला दुखावलं असेल तर त्यावर फुंकरही मारावी,” असं न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी म्हटलं आहे. न्यायाधीश अरुण मिश्रा प्रशांत भूषण यांचे वकील राजीव धवन आणि अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्या युक्तिवादावर बोलत होते.
दरम्यान प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून माफी मागण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन दिवसांचा वेळ दिला होता. पण प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास नकार दिला. “मी माफी मागणे ढोंगीपणाचे ठरेल. माझ्या विधानांना मी नाकारले व माफीनामा सादर केला तर स्वत:च्या सदसद्विवेकाशी प्रतारणा करण्याजोगे असेल. मी केलेली विधाने सद्हेतूने केली होती. सर्वोच्च न्यायालय वा विशिष्ट सरन्यायाधीशांचा अपमान करण्यासाठी ही विधाने केलेली नव्हती. न्यायालये लोकांचे हक्क आणि घटनेचे रक्षण करणारी असतात. त्यांच्या या प्रमुख भूमिकेपासून ती दूर जात असतील तर त्यांच्याबद्दल केलेली रचनात्मक टीका होती,” असं प्रशांत भूषण यांनी निवेदनात म्हटलं आहे.
प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने आपल्या वक्तव्यावर फेरविचार करून आपले वक्तव्य मागे घेण्यासंबंधी विचार करण्यास सांगितले त्यावर प्रशांत भूषण यांचे वकील राजीव धवन यांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाने टीका सहन केली पाहिजे असं मत व्यक्त केले . माफी मागण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही असेही ते म्हणाले. न्यायालयाने प्रशांत भूषण यांना काय शिक्षा दिली जावी असे विचारले असता ते म्हणाले की, “त्यांना शहीद होऊ देऊ नका…न्यायालय शिक्षा काय देईल यावर हा वाद सुरु राहणार आहे. जर न्यायालयाने उदारपणा दाखवला तरच ही वाद संपेल”. सुप्रीम कोर्टाने यावेळी आपण प्रशांत भूषण यांच्याकडून वेगळ्या निवेदनाची अपेक्षा केली असल्याचे सांगितले . “प्रशांत भूषण यांचे निवदेन वाचणे वेदनादायी होते. ते पूर्णपणे चुकीचे होते . ३० वर्षांहून जास्त अनुभव असणाऱ्या वकिलाची ही वागणूक योग्य नाही. फक्त तेच नाही तर सध्या हे अनेकवेळा पहायला मिळत आहे,” असे सर्वोच्च न्यालयाने म्हटले आहे.