MahanayakOnline : गल्ली ते दिल्ली : विशेष वार्तापत्र

नमस्कार . जय संविधान . महानायक ऑनलाइनच्या गल्ली ते दिल्ली या विशेष वार्तापत्रात आपलं स्वागत.
पाहुयात महत्वाच्या निवडक बातम्या .
१. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र खुला करण्याची मागणी होत असताना , राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना राज्यातील करोना परिस्थिती अजूनही नियंत्रणा नसल्याने कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन हटवला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शिवाय राज्यातील संपूर्ण लॉकडाऊन हटवण्याची काहीही घाई नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याउलट ज्या ठिकाणी लॉकडाऊन उठवण्याची घाई झाली आहे, तिथे पुन्हा लॉकडाऊन केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्यांच्या बैठकीत त्यांनी हि भूमिका जाहीर केली आहे.
२. दुसरी महत्वाची बातमी राजधानी दिल्लीतून . मोदी सरकारने देशातील प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी खाजगी कंपन्यांसोबत भागिदारी करण्याची योजना आखली असून यासाठी रेल्वे मंत्रालयाने खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील रेल्वेचं नेटवर्क जवळपास 12 क्लस्टरमध्ये विभागण्यात आले आहे. यामध्ये 109 अप अँड डाऊन खाजगी रेल्वे मार्गावर 151 मॉडर्न रेल्वे चालवण्याचा विचार आहे. हा करार ३५ वर्षासाठी करण्यात येणार असून या योजनेंतर्गत 30 हजार कोटी रुपयांची खाजगी क्षेत्राची गुंतवणूक असणार आहे.
३. आता पाहुयात चर्चेतली बातमी. फेसबुक / “द वॉल स्ट्रीट जर्नल” आणि भारतीय नेत्यांनी भाजपवर केलेल्या टीकेची. द वॉल स्ट्रीट जर्नलने भारतात लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या धोरणाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टवर कडक कारवाई करणाऱ्या फेसबुकने भाजपा नेते आणि संबंधित काही ग्रुपबद्दल नरमाईची भूमिका घेतल्याची चर्चा “द वॉल स्ट्रीट जर्नल” ने आपल्या वृत्तात केली आहे. हे वृत्त प्रसिद्ध होताच फेसबुकने भाजप नेत्यांच्या आक्षेपार्ह पोस्ट काढल्या असल्या तरी यावरून फेसबुक आणि भाजपवर टीका होत आहे. काँग्रेसचेनेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएस भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर नियंत्रण ठेवत असून या माध्यमातून ते खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्याबरोबरच प्रियांका गांधी , दिग्विजयसिंग आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही भाजप आणि फेसबुकवर टीका केली आहे.
४. बातमी कोरोनाच्या संसर्गाविषयी / देशात काल दिवसभरात 44 हजार 574 नवे रुग्ण आढळले तर 865 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनारुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ झाली असून रविवार संध्याकाळपर्यंत एकूण रुग्णसंख्या 26 लाख 34 हजार 256 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत 19 लाख 04 हजार 612 रुग्ण बरे झाले असून तब्बल 50 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र देशातील मृत्यूदर 1.93 टक्के एवढा म्हणजेच झाला आहे. देशातल्या Active रुग्णांच्या प्रमाणातही घट झाली असून ते प्रमाण 26.16 टक्के एवढं झालं आहे. तर रिकव्हरी रेट 71.91 एवढा झाला आहे.
५. राज्यात नव्याने 11 हजार 111 कोरोना रुग्ण आढळून आले असून 288 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने 10 हजारांहुन रुग्णांची दररोज भर पडत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 8836 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे 70 टक्क्यांवर गेलं असून मृत्यू दर 3.36 टक्क्यांवर आला आहे. तर कोविड रुग्णांची एकूण संख्या ही 5,95,865 एवढी झाली आहे. दरम्यान जगात भारताचा तिसरा तर देशात महाराष्ट्राचा कोरोनाच्या रुग्णांमध्ये पहिला क्रमांक आहे. राज्यातील भाजपनेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनाही कोरोनाने गाठले असून त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. त्यांनी स्वतः ट्विटरवरून हि माहिती दिली आहे.
६. कोरोनाविषयीच्या आणखी काही विशेष बातम्या / उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचाही कोरोनाने घेतला बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या महिन्यांत त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना लखनऊ येथे दाखल करण्यात आले होते. ते कोरोनाशी लढा देत होते..अशातच त्यांना किडनी आणि ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. ज्यानंतर त्यांना शुक्रवारी रात्री व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
७. पाहुयात आणखी एक चर्चेतली बातमी / कोरोनावर भाजपचे खासदार मंत्री यांनी सातत्याने सल्ले दिले आहेत .याच मालिकेत सध्या आणखी एक भाजप खासदार त्यांच्या व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप खासदार सुखबीरसिंह या व्हिडीओमध्ये चिखलाने अंघोळ करताना आणि शंखनाद करताना दिसत आहेत. कोरोनाची भीती बाळगू नका. चिखलानं अंघोळ केल्यानं आणि शंख वाजवल्यानं कोरोनाचा संसर्ग होणार नाही असा दावा त्यांनी केला आहे.
७. बातमी पावसाविषयी / केवळ राज्यातच नव्हे तर देशात सर्वत्र जोरदार पावसाने हाहाकार माजवला असून महाराष्ट्रातही गेल्या दोन आठवडाभरापासून पावसाचा धूम धडाका सुरु आहे. कुलाबा वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. राज्यात पर्जन्यमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे आता राज्यातील धरणे भरण्यास प्रारंभ झाला आहे.
८. प्रसारमाध्यमांनी वाढवलेला पवार कुटुंबातील वाद अखेर पवार कुटुंबीयांनीच मिटवला असल्याने पवार कुटुंबीय फुटावे म्हणून डोळे लावून बसलेल्या माध्यमाचे डोळे आता पाणावले आहेत . राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा नातू पार्थ पवार याची कानउघडणी केल्यामुळे प्रसारमाध्यांनी पवार कुटुंबात चांगलाच वाद रंगवला होता त्याला भाजप नेत्यांकडून प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष खतपाणी घालण्यात येत होते परंतु आता या वादावर पडदा पडल्याचे सांगण्यात येत आहे.
९. शेवटी एक धक्कादायक बातमी उत्तर प्रदेशातून / वाढत्या गुन्हेगारीमुळे उत्तर प्रदेशात गरिबांचे जगणे हराम, झाले असून अंगाचा थरकाप उडवणाऱ्या एका घटनेत एका १३ वर्षीय दलित मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. आणि त्यानंतर तिची क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीतील ईसापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा बसपा नेत्या मायावती यांनी निषेध केला आहे.