IndiaNewsUpdate : विदेशातून भारत येणारांना ७ दिवसाच्या क्वारंटाईनची सवलत पण दाखवावे लागेल कोरोना टेस्टचे प्रमाणपत्र

भारतात तातडीच्या कामासाठी विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाने याबाबत एक निर्णय घेतला असून त्यामुळे विदेशातून मुंबईत येणाऱ्या शेकडो प्रवाश्यांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयानुसार संबंधित प्रवाशांना आता संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार नाही. विदेशातून येणारे बहुतांश नागरीक हे तातडीच्या कामानिमित्त परत येत आहेत. त्यांना पूर्वीच्या नियमांमुळे मोठी अडचण येत होती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यासाठी या प्रवाशांना आपली कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. अर्थात ही टेस्ट प्रवासाच्या ९६ तासांपूर्वी झालेली असावी अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही नियमांमध्ये सुट दिली होती. या आधी विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस संस्थात्मक आणि ७ दिवस घरातच क्वारंटाईन व्हावे लागत होते . आता मात्र अशा प्रवाशांकडे कोविड टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र असेल तर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये सुट देण्यात आली आहे. मात्र तरीही त्यांना ७ दिवस घरातच क्वारंटाईन राहावे लागेल.