IndiaNewsUpdate : AirIndiaControversy : टाटा एअर इंडिया विकत घेण्याच्या तयारीत , खा. सुब्रह्मण्यम स्वामी यांचा फौजदारीचा इशारा

If Rotten T gets Air India despite ED investigation on money laundering by Tatas for Air Asia, payment in Dubai to a terrorist, FIPB fraud in getting licence for Joint venture with Air Asia and Vistara& Niira Radia tapes I will file a criminal complaint against Goverment bigwigs
— Subramanian Swamy (@Swamy39) August 14, 2020
एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा समूह या महिन्याच्या अखेरपर्यंत बोली लावण्याची शक्यता असल्याचे वृत्त आल्यानंतर भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी आक्रमक झाले आहेत. जर हा करार पुढे सरकला तर याप्रकरणी सरकारमधील मोठ्या व्यक्तींविरोधात फौजदारी तक्रार दाखल करेन, असा इशारा स्वामी यांनी दिला आहे. सुब्रमण्यन स्वामी यांनी ट्विट करुन, टाटा ग्रुपने एअर एशियासाठी केलेल्या मनी लॉन्ड्रिंगबाबत अंमलबजावणी संचालनालयाची सुरू असलेली चौकशी, दुबईमध्ये एका दहशतवाद्याला केलेलं पेमेंट आणि एअर एशिया व विस्तारा या दोन विमान कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमासाठी गैरवापर करुन मिळवलेली परवानगी असे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. याशिवाय, नीरा राडिया टेपचाही उल्लेख करताना स्वामींनी हा करार पुढे सरकल्यास सरकारमधील मोठ्या व्यक्तींविरोधात फौजदारी तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे टाटा एअरवेज या भारतातल्या पहिल्या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीचे स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयीकरण झाले आणि तिचे नामकरण एअर इंडिया करण्यात आले परंतु दरम्यान सुमारे ३० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाखाली बुडाल्यामुळे एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी ही कंपनी विकत घेण्यास पुन्हा टाटा समूहाने तयारी केल्याचे वृत्त आहे.
या प्रस्तावासंदर्भात टाटा ग्रुपने एअर इंडियाचं मूल्यांकन करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत टाटा ग्रुप एअर इंडियासाठी बोली लावेल असे सांगितले जात जात आहे. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबतचं वृत्त दिले आहे. पण, जोपर्यंत मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत यावर काहीही प्रतिक्रिया देणं घाईचं ठरेल, असे ताटाच्या काही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. टाटा कंपनी सध्या या प्रस्तावाचे मूल्यांकन करत असून मूल्यांकन झाल्यानंतर योग्य वेळ आल्यावरच कंपनी बोली लावेल, असा खुलासा टाटा सन्सच्या प्रवक्त्याकडून करण्यात आला असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे सध्या मात्र आर्थिक भागीदार आणण्यासंबंधी कंपनीची कोणतीही योजना नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.
टाटा ग्रुप सध्या एअर इंडियाच्या योग्य मूल्यांकनासाठी कायदेशीर सल्ला घेत असून सल्लागारांसोबतही चर्चा करत आहे. टाटा ग्रुप लवकरच एअर एशिया इंडिया आणि एअर इंडिया यांचे विलीनीकरण करु शकते अशीही चर्चा आहे. एअर एशिया इंडियामध्ये टाटा सन्सची ५१ टक्के भागीदारी आहे. म्हणजे एअर इंडिया आणि एअर एशिया इंडिया यांचं विलीनीकरण होऊन केवळ एअर एशिया इंडिया कंपनी राहील, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. एअर एशिया इंडियाशिवाय पाच वर्ष जुनी विमान कंपनी ‘विस्तारा’मध्येही टाटा ग्रुपची भागीदारी आहे. ‘विस्तारा’मध्ये टाटाशिवाय सिंगापूर एअरलाइन्सची ४९ टक्के भागीदारी आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही असे टाटा ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर काही तज्ज्ञांनी, ‘एअर इंडियाला खरेदी करणे अत्यंत किचकट प्रस्ताव आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रियांची माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच, त्यासाठी स्टेकहोल्डर्सचं समर्थन आणि सरकारच्या मदतीचीही गरज आहे’, असेही कंपनीने म्हटले आहे.