CoronaWorldNewsUpdate : धक्कादायक : कोरोनमुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा झाला कोरोना….

चीनमध्ये कोरोनामुक्त होऊन कित्येक महिने उलटल्यानंतरही दोन रुग्ण पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चीनची चिंता वाढली आहे. यापूर्वी करोनाची लागण झालेल्यांमध्ये करोना विषाणू जिवंत राहत नाहीत असे म्हटले जात होते परंतु कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये पुन्हा कोरोनाची लक्षणे आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ब्लूमबर्गने यासंबंधी वृत्त दिलं आहे. दरम्यान काही अभ्यासकांनी करोनाशी लढा देताना निर्माण केलेली रोगप्रतिकारक शक्ती काही महिन्यांच्या अंतराने पुन्हा कमी झाल्यावर संसर्ग होण्याची शक्यता बळावू शकते असे म्हटले आहे.
या वृत्तानुसार चीनमधील हुबेई प्रांतात वास्तव्यास असणाऱ्या ६८ वर्षीय महिलेला सर्वात आधी करोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते . सहा महिन्यांपूर्वी हि महिला करोनामुक्त झाली होती. यानंतर आता अजून एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीला एप्रिल महिन्यात परदेशातून परतल्यानंतर करोनाची लागण झाली होती. सोमवारी या व्यक्तीला पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग झाल्याचं आढळलं. या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जवळच्या लोकांपैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळलेलं नाही. मात्र त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
दरम्यान कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी अनेक देश लस शोधण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत. मात्र अशा परिस्थितीत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा संसर्ग होत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोना रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह सापडण्याचा प्रकार दुर्मिळ असून काही ठराविक रुग्णांनाच पुन्हा लागण होत असल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. करोना विषाणूंचा सामना करण्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी पडत आहे का ? असाही प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आला आहे.