BuldhanaNewsUpdate : मोठी बातमी : शाब्बास पोलीस : दोन बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा , पोलीस ठाण्यावर रोषणाई , फटाके फोडले आणि मिठाईही वाटली….

Correction: The Sessions Court has given capital punishment to the 2 accused in the rape case of a 9-year-old girl in Buldana's Chikhli. #Maharashtra https://t.co/DPe9HYsBct
— ANI (@ANI) August 14, 2020
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर वर्षभरात तत्परतेने यशस्वी तपास करून चार्ज शीट दाखल करून आरोपींच्या गळ्यात फास टाकल्याचा आनंद चिखली पोलिसांनी व्यक्त केला. हा आनंद साजरा करण्यासाठी पोलिसांनी चिखली पोलीस ठाण्यावर आकर्षक विद्युत रोषणाई तर केलीच पण पोलीस ठाण्याच्या बाहेर फटाक्याची आतषबाजी करून लोकांना पेढेही वाटले. पोलीस निरीक्षक गुलाबराव सिंग यांनी हा आनंद व्यक्त करून तपास करणाऱ्या पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.
या खटल्याची अधिक माहिती अशी कि , दोन आरोपींनी चिखली येथील एका ९ वर्षीय मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करुन जबर जखमी केले होते. या खटल्यात सागर विश्वनाथ बोरकर व निखील लिंबाज गोलाईत या दोन आरोपींना विशेष न्यायाधीश चित्रा एम. हंकारे यानी दोषी धरून फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेल्यावर्षी २७ एप्रिल २०१९ रोजी रात्री अंदाजे एक ते दोन वाजेच्या सुमारास आरोपींनी अल्पवयीन मुलीला स्कुटीवरुन पळवून नेले. आणि स्मशानभूमी समोरील मोकळ्या जागेत आळी-पाळीने बलात्कार केला होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडलांनी त्याच दिवशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपींविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.
दरम्यान या प्रकरणाचा प्राथमिक तपास प्रारंभी ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी केला तर अंतिम तपस तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बाबुराव महामुनी यांनी केला. यासाठी त्यांना पोलिस कर्मचारी शरद गिरी व महिला पोलिस कर्मचारी ज्योती मुळे यांनी सहकार्य केले. तपासाअंती दोषारोप पत्र येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने मुलीस पळवून नेतांना साक्षीदार शिवाजी साळवे, पंच शुभम भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कदम, डॉ. विजय खरपास, डॉ. मनिषा चव्हाण, डॉ. नुतन काळे, तसेच औरंगाबाद येथील तज्ज्ञ डॉ. विजय कल्याणकर, डॉ. संजय पगारे, जात प्रमाणपत्रावरील साक्षीदार रवी टाले, राजू देशमुख , नायब तहसीलदार कुणाल झाल्टे, तपास अधिकारी गुलाबराव वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी या साक्षीदारासह पीडीत मूलीचा पुरावा नोंदवण्यात आला. सदर खटल्यातील साक्षी पुरावे हे घटनेला पुरक व एकमेकाशी सुसंगत असल्याने पीडित मुलीवर आरोपींनी बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. वसंत भटकर, ॲड. सोनाली सावजी यांनी काम पाहिले. यासाठी त्यांना पैरवी म्हणून पोलिस कर्मचारी सुनील पवार यानी सहकार्य केले.