CoronaMaharashtraUpdate : खा. नवनीत राणा यांची प्रकृती अधिकच खालावली, नागपूरहून मुंबईला हलवले….

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा नागपूरवरून मुंबईला उपचारासाठी रवाना झाल्या असल्याची महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा होत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ मुंबईला रवाना करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांचे पती आमदार रवी राणादेखील कोरोना पॉझिटिव्ह असून ते देखील त्यांच्यासोबत मुंबईत येणार आहेत. नवनीत राणा कोरोना झाल्यानंतर त्यांना आधी अमरावतीत आणि नंतर नागपुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारार्थ दाखल करण्यात येत आहे. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असून नवनीत राणा यांच्या छातीत मोठ्या प्रमाणावर दुखतं असल्याचे सांगण्यात येत आहे.
खा. नवनीत राणा यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची आणि कार्यकर्त्यांची चिंताही वाढली आहे. नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना आधी अमरावतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु पाच ते सहा दिवस उलटूनही त्यांची ताब्यात अधिकच बिघडल्याने त्यांना नागपूरच्या ओखार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 6 ऑगस्ट रोजी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासह त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. धक्कादायक म्हणजे नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. दरम्यान राणा यांच्या कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले. या सदस्यांमध्ये नवनीत राणांच्या मुले आणि सासू-सासऱ्यांचाही समावेश आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं कळल्यावर गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही नवनीत राणा यांनी केले होते.