MaharashtraCoronaEffect : कोरोनाबाधित खा . नवनीत राणा अमरावतीहून नागपूरच्या रुग्णालयात दाखल…

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना अमरावतीहून थेट नागपूरमध्ये नेण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार नवनीत राणा यांचा करोना रिपोर्ट ६ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी अमरावतीत घरीच उपचार घ्यायला सुरुवात केली होती. मात्र, पाच दिवसानंतरही त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. उलट त्यांना अधिकच त्रास होऊ लागल्याने अखेर त्यांना नागपूरमध्ये नेण्यात आलं असून येथील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांच्यासह त्यांचे पती आमदार रवी राणा आणि दोन्ही मुले, सासू-सासऱ्यांसह कुटुंबातील १२ जणांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर उपाचर सुरू आहेत. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवरही वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू असून मुलांवर घरीच अमरावतीला उपचार सुरू आहेत. नवनीत राणा या खासदार असल्याने त्यांना मतदारसंघात फिरावे लागते. करोनाचं संकट असल्याने करोना परिस्थितीचा आढावा घेतानाच विभागांमध्ये जाऊन परिस्थितीची माहिती घेण्याचं काम त्या करत होत्या. शिवाय त्यांनी मतदारसंघात स्वत: धूर फवारणी केली होती. सतत कार्यकर्ते आणि मतदारांच्या त्या संपर्कात होत्या. त्यामुळेच त्यांना करोनाची लागण झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.