MumbaiNewsUpdate : टीव्ही अभिनेता समीर शर्मानंतर आर्थिक संकटातून आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या….

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात आलेले फ्रस्टेशन , आर्थिक अडचणींचा सामना करताना डिप्रेशन मध्ये जाणारे अनेक लोक आत्महत्या करीत असल्याचे चित्र आहे . दरम्यानच्या काळात हे प्रकार ठमाबावेत म्हणून राज्य शासनाने हेल्पलाईनही सुरु केली होती परंतु तरीही काही फरक पडलेला दिसत नाही. गेल्या काही महिन्यांपासून तर सिने कलाकारांच्या आत्महत्यांचं जणू सत्रच सुरु झालं आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत, टीव्ही अभिनेता समीर शर्मा यांच्यानंतर आणखी एका भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविल्याचे वृत्त आहे. आर्थिक विवंचना आणि झालेली फसवणुकीवरून आपण आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट मागे ठेवत भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आपल्या काशिमिरा येथील राहत्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. घटना 2 ऑगस्टची आहे.
आत्महत्येपूर्वी अनुपमा यांनी सुसाइड नोटही लिहून ठेवली होती. अनुपमा ही 40 वर्षांची होती. ती भोजपूरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. आत्महत्या करण्यापूर्वी रात्री 12 च्या दरम्यान तिने फेसबुक लाईव्ह ही केलं होतं. तिने आपल्या फॅन्ससोबत संवादही साधला होता. या फेसबुक लाईव्हमध्ये अनुपमाने “कुणावर विश्वास ठेवू नका, असं सांगितले होते. तसेच तिला कशाप्रकारे फसवण्यात आले यावरही ती बोलली आहे. अनुपमाच्या फ्लॅटमधून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली असून, यामध्ये तिने आत्महत्येची दोन कारणे सांगितली आहेत.
या सुसाईड नोट मध्ये तिने म्हटले आहे कि , ”माझ्या एका मित्राच्या सांगण्यावरून मी मालाडच्या विस्डम प्रोड्युसर कंपनीमध्ये दहा हजार रुपये गुंतवले आहेत. ती कंपनी मला हे पैसे डिसेंबर 2019 मध्ये देणार होती. मात्र आता टाळाटाळ केली जात आहे.” तिला ही दुसऱ्यांना पैसे द्यायचे होते. तर दुसरं अनुपमाने या चिठ्ठीमध्ये एका पत्रकार मनीष झा याचेही नाव घेतले आहे. अनुपमा यांनी मनीष झा याला लॉकडाऊनमध्ये गावी जाण्यास निघताना, स्कूटर दिली होती. गावाहून परतल्यानंतर तिने झा कडून स्कूटर परत मागितली होती, मात्र तो देत नव्हता. तिला नवीन काम करायचं होतं. तिच्याकडे रिक्षासाठीही पैसे नव्हते, त्यामुळे स्कूटर तिला हवी होती. अनुपमा या आपल्या पती बरोबर गावी गेल्या होत्या. दहा दिवसापूर्वी त्या एकट्या काशिमिराच्या आपल्या घरी परत आल्या होत्या. फेसबुक लाइव्ह नंतर तिने रात्री आपल्या शेजाऱ्यालाही कॉल केला होता. अनुपमा अत्यंत शांत स्वभावाची असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं आहे. 2018 साली तिच्या 15 वर्षाच्या मुलीनेही आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. या लॉकडाऊन दरम्यान ती आर्थिक विवंचनेत होती. तिला काहीचे पैसे द्यायचे होते. सध्या पोलिसांनी भादवि कलम 306 अन्वये मनीष झा आणि विस्डम कंपनीचे प्रोड्युसर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून, पुढील तपास करत आहेत. सध्या याप्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाही.