MaharashtraNewsUpdate : कोरोना उपचार : केंद्राकडून राज्य सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप…

राज्यातील आरोग्य यंत्रणा दिवसरात्र घेत असल्यानेच रुग्ण सुधारण्याच्या प्रमाणात वाढ वाढ होत असल्याने केंद्र सरकारनेच राज्याच्या प्रयत्नांवर समाधान व्यक्त केलं आहे. करोना विरुद्ध लढाईत राज्य सरकार आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा झोकून देऊन काम करत आहे. या स्थितीत करोना मृत्यू, चाचण्या, एकूण रुग्णसंख्या अशा अनेक मुद्द्यांवरून राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांकडून सरकारला सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य सह सचिव लव अग्रवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत राज्य सरकारच्या विविध उपाययोजनांची प्रशंसा करण्यात आली. एकप्रकारे केंद्राकडून राज्याला मिळालेली ही समाधानाची पावतीच ठरली आहे.
देशातील कोरोना उपचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, लव अग्रवाल, सर्व विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला संबोधित करताना लव अग्रवाल यांनी महत्त्वाची मते मांडली. मुंबई तसेच महाराष्ट्राने आणखी काही उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे बारकाईने लक्ष दिले तर कोविड मुकाबल्याच्या बाबतीत संपूर्ण देशासाठी महाराष्ट्र उदाहरण निर्माण करू शकतो, लव अग्रवाल म्हणाले. अग्रवाल यांनी विशेषत: मुंबईमध्ये ज्या पद्धतीने कोविडचा मुकाबला करण्यात येत आहे, त्याविषयी समाधान व्यक्त केले.
राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात करोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गुरुवारची आकडेवारी लक्षात घेता एकाच दिवसात १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर राज्यातील रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४६ हजार ३०५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात मुंबईत करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव राहिला. मात्र आता मुंबई सावरत आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट ७७ टक्क्यांवर पोहचला आहे तर रुग्ण दुपटीचा वेग ८० दिवसांवर पोहचला आहे. हे आकडे बऱ्याच अंशी दिलासा देणारे आहेत.