MumbaiCrimeNewsUpdate : भिवंडीत सामूहिक बलात्कार , दोन भावांसह चौघांना अटक

भिवंडीत एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन भावांचाही समावेश आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडीमध्ये राहणारी पीडित महिला तिच्या ओळखीच्या महिलेच्या घरी गेली होती. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यास निघाली. राहनाळ गावच्या हद्दीत असलेला रेल्वे बोगदा ओलांडून चरणीपाड्याकडे जात असताना आरोपींनी तिला गाठले. रेल्वे बोगद्याजवळच गवतामध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अत्याचाराचा हा प्रकार ३१ जुलैच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडला. महिलेच्या तक्रारीनंतर शनिवारी मध्यरात्री नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ आरोपींची धरपकड सुरू केली. दोन भावांसह एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून, चारही आरोपी भिवंडी परिसरातच राहतात. आरोपी २३ ते २८ वर्षे वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातील दोन भावांना न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.