IndiaCrimeNewsUpdate : कैद्यांना अंमली पदार्थ पुरवण्याच्या आरोपाखालीअटक केलेल्या तुरुंग उपअधीक्षकाच्या मुलाची जेल उडवून देण्याची धमकी…

देशात सर्वत्र कोरोनाचा कहर चालू असताना गुन्हे काही कमी होताना दिसत नाहीत. अशाच एका प्रकरणात तुरुंगातील कैद्यांना अंमली पदार्थ पुरवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या तुरुंग उपअधीक्षकाच्या दिवट्या मुलाने तुरुंग बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी दिली. मित्रांच्या मदतीनं त्यानं ऑडिओ रेकॉर्ड केल्यानंतर ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी कि , गुरुग्राम पोलिसांनी तुरुंगात कैद्यांना मोबाइल, सिम कार्ड आणि अंमली पदार्थ पुरवत असल्याच्या आरोपाखाली २३ जुलै रोजी तुरुंग उपअधीक्षक धर्मवीर चौटाला याला अटक केली होती. या अधिकाऱ्याच्या घरी छापेमारी करून ११ सिम कार्ड आणि अंमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुरुंगात झाडाझडती घेण्यात आली. त्यात १२ मोबाइल, ९ सिम कार्ड आणि ११ मोबाइलच्या बॅटरी हस्तगत केल्या होत्या. या प्रकरणात चौटालाला अटक झाल्यानंतर २४ जुलैलाच मुलाने मित्रांच्या मदतीनं ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केली. तुरुंग अधीक्षकांपर्यंत ती पोहोचावी यासाठी त्याच्या मित्रांनी क्लिप व्हायरल केली. त्यानंतर मोबाइलमधून ऑडिओ क्लिप डिलिट केली होती. तुरुंग उपअधीक्षक जे रॅकेट चालवत होता, त्यातील अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत असतानाच, या धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. तुरुंग उपअधीक्षकाचा मुलगा रवी चौटाला यानं ही ऑडिओ क्लिप तयार केली होती. त्यात तुरुंग बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी दिली होती. व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप तुरुंग अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर तुरुंगातील सहायक अधीक्षक संजय कुमार यांनी कारवाईसाठी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. रवी चौटाला हा तुरुंग परिसरातील क्वार्टर्समध्येच राहत होता. त्यामुळे रवीसोबत अनेकदा बोलणे व्हायचे. त्यामुळे त्याचा आवाज लगेच ओळखला, अशी माहिती संजय कुमार यांनी दिली.
या व्हायरल क्लिपमध्ये आरोपीच्या मुलाने म्हटले आहे कि , तुरुंगातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हल्ल्यातून वाचण्यासाठी त्वरित आपली बदली करून घ्यावी. माझ्या वडिलांना जामीन मिळू दे, त्यानंतर तुरुंग अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना बघून घेतो. हरयाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील सर्व गँगस्टर आपल्या संपर्कात आहेत. गुरुग्रामच्या तुरुंगात आपल्या पित्याचा अपमान केला गेला. मी रवी चौटाला असून, तुरुंग उपअधीक्षक धर्मवीर चौटालाचा मुलगा आहे, असे या ऑडिओमध्ये ऐकायला मिळतं. ही गंभीर बाब असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करून रवी चौटाला याला अटक केली.