इस्लामपूर आगारातील एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या , दोन महिन्यांपासून झाला नव्हता पगार….!!

सांगली जिल्ह्यातील एका एसटी कर्मचाऱ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमोल धोंडीराम माळी (वय-35) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पेठ येथे गुरुवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. अमोल माळी हे इस्लामपूर (ता. सांगली) आगारात मॅकॅनिक होते. एसटी बस सेवा बंद असल्यामुळे अमोल याचा दोन महिन्यांपासून पगार झाला नाही. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. यामुळे अमोल यांनी आत्महत्ये सारखं टोकाच पाऊल उचलत राहत्या घरी पत्नीच्या साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती असी की, अमोल माळी याच्या पगारावरच कुटुंबाचा उदर्निवाह सुरु होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं ते आणि पत्नी इतर ठिकाणी मजुरी करुन घर खर्च चालवत होते. याच नैराश्येतून अमोल यांनी आपली जीवन प्रवास संपवलं. अमोल यांच्या पश्चात आई, पत्नी, 5 वर्षांचा मुलगा, 3 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. राज्यात कोरोनाचं संकट कोसळलं आहे. परिणामी राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे चांगल्या चांगल्यांचं कंबरडं मोडलं आहे. आर्थिक घडी विस्कटली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हाअंतर्गतही एसटीची सेवा बंद आहे. गेले चार महिने एसटी बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे पगारही झालेले नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊन काळात एसटी आगार चार महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही झालेले नाहीत. त्यामुळे हजारो एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
एस टी महामंडळाच्या पत्रकामुळे अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड
दुसरीकडे, एसटी महामंडळानं गेल्या आठवड्यात एक पत्रक जारी केलं आहे. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून कर्मचारी सेवा खंडीत करण्याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे. 2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे एसटी बंद असल्याने उत्पन्न ठप्प झालं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
सरळसेवा 2019 मध्ये भरती झालेले चालक-वाहक यांची सेवा तात्पुरती खंडित करावी, भविष्यात गरज असेल तर ज्येष्ठतेनुसार पुन्हा सेवेत घ्यावे, चालक-वाहक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, अन्य अधिकारी किंवा अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार प्रशिक्षण घेत असतील, त्याचे प्रशिक्षण थांबवावे, कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतलं जाईल, असही पत्रकात म्हटलं आहे. जवळपास 8500 वाहक, चालकांसह इतर कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच प्रशिक्षण सुरु आहे, अशांना थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.