PuneCrimeNewsUpdate : डिजिटल फलक खरेदीत आर्थिक घोटाळा, हवामान खात्याच्या शास्त्रज्ञासह चौघांविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या डिजिटल फलक खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वेधशाळेच्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञासह तांत्रिक अधिकारी तसेच मुंबईतील एका खासगी कंपनीच्या संचालकावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेधशाळेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.गुरफान बेग, तत्कालिन तांत्रिक अधिकारी विपिन माळी तसेच मुंबईतील व्हिडिओ वॉल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अनिल गिरकर, मनीषा गिरकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून हवेची गुणवत्ता तसेच हवामानाचा अंदाज वर्तवणारे डिजिटल फलक पुणे शहरातील 12 ठिकाणी काही दिवसांपूर्वी बसवण्यात आले आहेत. मुंबईतील व्हिडिओ वॉल इंडिया प्रा.लि. कंपनीला हे डिजिटल फलक बनवण्याचं काम देण्यात आलं आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्च अर्थात ‘सफर’ या योजनेंतर्गत शहरात 12 ठिकाणी डिजिटल फलक बसवण्यात आले होते. फलक बसवण्याच्या कंत्राटमघ्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार सीबीआयचच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.