IndiaNewsUpdate : खा. अमरसिंह यांचे निधन , टायगर अभी नही रहा… !!

राज्यसभा खासदार आणि समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांचे सिंगापूर येथे निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. उत्तर प्रदेशातल्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. जुलै २०१६ मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. तेव्हापासून ते राजकारणात काहीसे कमी सक्रिय होते. याच वर्षी त्यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशनही करण्यात आले होते. प्रदीर्घ आजारामुळे त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. अमर सिंह हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले होते. समाजवादी पक्षापासून फारकत घेतल्यानंतर ते राजकारणात काहीसे कमी सक्रिय होते. गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ते आजारी होते. त्याआधी त्यांची जवळीक भाजपासोबत वाढली होती. १९९६ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेल्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती. बिग बी अमिताभ बच्चन यांचे आणि त्यांचेही चांगले संबंध होते. मात्र या दोघांमध्ये काही मतभेदही झाले होते. ज्यानंतर यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांची माफीही मागितली होती.
‘टायगर अभी जिंदा है’
उल्लेखनीय म्हणजे, मार्च महिन्यात परदेशात उपचार सुरू असतानाच त्यांच्या निधनाची अफवा मीडियात पसरली होती. त्यावर त्यांनी ‘टायगर अभी जिंदा है’ असा व्हिडिओ मॅसेज सोशल मीडियावरून आपल्या हितचिंतकांना दिला होता. सिंगापूरमधून मी अमर सिंह बोलतोय. ‘आजाराने त्रस्त आहे. पण घाबरलेलो नाही. हिंमत अजून बाकी आहे, जोशी बाकी आहे आणि होशही बाकी आहे. माझ्या काही शुभचिंतकांनी आणि मित्रांनी अफवा पसरवलीय. यमराजने मला बोलावल्याची. असं काही झालेलं नाही. माझ्यावर उपचार सुरू आहेत’, असं अमर सिंह यांनी या व्हिडिओत म्हटलं होतं. तर त्याअगोदर आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सोशल मीडियावरून अमिताभ बच्चन आणि कुटुंबीयांची माफी मागितल्यानंही अमर सिंह चर्चेत आले होते. अमर सिंह यांचे अमिताभ बच्चन आणि कुटुंबीयांशी अतिशय जवळचे संबंध होते. गेल्या काही वर्षांत या नात्यामध्ये काही कारणानं कटुता आली होती. परंतु, फेब्रुवारी महिन्यात ‘आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे आणि याच निमित्तानं मला अमिताभ बच्चन यांच्याकडून एक मॅसेज मिळाला. आज आयुष्याच्या या वळणावर जेव्हा मी जीवन आणि मृत्यूचा सामना करत आहे, मी अमितजी आणि त्यांच्या कुटुंबाकडे आपल्या टिप्पणीसाठी माफी मागतो. ईश्वर त्यांचं भलं करो’ असं ट्विट अमर सिंह यांनी केलं होतं.