CoronaMaharashtraUpdate : गेल्या 24 तासांत 232 पोलिसांना कोरोनाची लागण, 7414 पोलिसांची कोरोनावर मात

गेल्या 24 तासांत 232 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. गृह विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 9449 पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्यात 971 पोलिस अधिकारी तर 8478 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचे सर्वाधित रुग्ण महाराष्ट्रात आहे. अशात लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. परिणामी कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. राज्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी 10320 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 265 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
उपलब्ध माहितीनुसार सध्या राज्यात 219 पोलिस अधिकारी आणि 1713 पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत 7414 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर धक्कादायक म्हणजे आतापर्यंत 9 पोलिस अधिकारी आणि 94 पोलिस कर्मचारी मिळून अशा एकूण 103 पोलिसांचा कोरोनानं बळी घेतला आहे. त्याचप्रमाणे देशासह राज्यात जुलै महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच ऑगस्टमध्येही कोरोनाबाधित रुग्णांच आकडा आणखी वाढेल, अशी भीती तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
भारतात मावळत्या जुलै महिन्यात 11.1 लाख कोरोनाबाधित आढळले असून 19 हजार 122 जणांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. खरंतर ही आकडेवारी खूप मोठी आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत 2.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून महिन्याच्या अखेरीस देशात कोरोनाबाधितांची संख्या 4 लाखांच्यावर होती. तर दुसरीकडे जून महिन्याच्या तुलनेत मृतांची संख्यादेखील 1.6 टक्क्यांनी वाढली आहे. जून महिन्याच्या अखेरीस कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्याही 11 हजार 988 इतकी होती. जुलै महिन्यात कोरोनानं इतका वेग पकडला की अखेरच्या 15 दिवसांमध्ये तब्बल 7.3 लाख रुग्णांची नोंद करण्यात आली. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे जसजसे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले तसा कोरोनाचा धोका वाढल्याचं चित्र आहे. अशात देशातील कोरोनाव्हायरसचा वेग काही थांबत नाही आहे. देशात कोरोनाची सर्वाधिक सक्रिय प्रकरणे महाराष्ट्रात आहेत.
दरम्यान महाराष्ट्रातील रूग्णालयात एक लाखाहून अधिक संक्रमित लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर तामिळनाडू, तिसर्या क्रमांकावर कर्नाटक, चौथ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आणि दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे. या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय प्रकरणे आहेत. सक्रीय प्रकरणात भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच भारत हा चौथा देश आहे जिथे बहुतांश संक्रमितांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.