CoronaMaharashtraUpdate : राज्यात १०० पोलिसांचा मृत्यू , आठ अधिकारी आणि ९२ कर्मचाऱ्यांचा समावेश….

राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून कोरोनाच्या संसर्गामुळं राज्यात आतापर्यंत १०० पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पोलिसांवरील जबाबदारी प्रचंड वाढली आहे. करोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यासाठी लॉकडाऊन यशस्वीपणे राबवणं गरजेचे आहे. त्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून पोलीस आघाडीवर राहून कर्तव्य बजावत आहेत. लॉकडाऊनचे नियम नागरिकांकडून मोडले जाऊ नयेत म्हणून डोळ्यात तेल घालून काळजी घेत आहेत. दरम्यान अनेक पोलिसांना वेळीच उपचार न मिळाल्यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.
राज्यात आतापर्यंत ९,०९६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. यात ९३७ अधिकारी तर ८१५९ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील ७२२ अधिकाऱ्यांसह एकूण ७०८४ पोलीस करोनामुक्त झाले आहेत. तर, आतापर्यंत १०० पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात आठ अधिकारी आणि ९२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यातील ठिकठिकाणच्या रुग्णालयांमध्ये एकूण १९१२ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. त्यात २०७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अयोग्य जीवनशैली, प्रकृतीच्या तक्रारी, असंतुलित आहार या सगळ्यांचा अप्रत्यक्ष परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर झाला आहे. तासन् तास ड्युटीवर असल्यानं व्यायामाचा अभाव, ड्युटीसाठी सतत बाहेर असल्यामुळं बाहेरील खाद्यपदार्थामुळं पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. यामुळंच पोलिसांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली असल्याची शक्यता आहे.
उपलब्ध माहितीनुसार ५५ वर्षांहून अधिक वय असलेल्या पोलिसांमध्ये करोनाची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं अशा पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे अनेक पोलीस करोनावर मात करून पुन्हा ड्युटीवर रुजू झाले आहेत. पोलिसांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने ‘टीम सुरक्षा’ ही संकल्पना सुरू केली आहे. टीम सुरक्षेत सहभागी होण्याचं आवाहनही पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.