PuneNewsUpdate : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुख्यमंत्री निघताहेत उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यातील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर निघणार असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पुण्याचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार करण्यात येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान उपलब्ध माहितीनुसार, उद्धव ठाकरे गुरुवार सकाळी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते करोना निर्मूलन आढावा बैठक घेणार आहेत. बैठकीत पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात करोना संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही माहिती घेतली जाईल. बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच विभागीतय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
सोमवारी पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार पुण्यावर अन्याय करत असल्याची टीका केली होती. “हे सरकार मुंबईकडे जितकं लक्ष देतं तितकं पुण्याकडे देत नाही. पुण्यावर अन्याय केला जात आहे. पुण्यात क्वारंटाइन सेंटर, आयसीयू बेड वाढवण्याची गरज आहे. पण पुणे, पिंपरी पालिकेला एकाही नव्या पैशांचं अनुदान राज्य सरकारने दिलेलं नाही. वेळेत व्यवस्था निर्माण केली तर लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागेल,” असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील मुख्यमंत्र्यांनी थोडं फिरायला हवं असा सल्ला दिला होता. “धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतच आहे. तसंच निर्णय घेताना ते सर्व सहकाऱ्यांनाही विश्वासात घेतात. त्यांनी एका ठिकाणी बसून काम करण्यात काही वाद नाही. परंतु त्यांनी थोडं फिरायलाही हवं,” असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.