IndiaNewsUpdate : अयोध्या भूमिपूजन : एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे म्हणणे नेमके काय आहे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिर भूमी पूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन’ (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमात सहभागी होणे हे संविधानाच्या शपथेचं उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. धर्मनिरपेक्षता हे भारताच्या संविधानाचं अभिन्न अंग आहे आणि पंतप्रधान या कार्यक्रमात सहभागी होऊन संविधानाचा अनादर करत असल्याचं ओवैसी यांनी म्हटलंय. सोबतच त्यांनी बाबरी मशिद विध्वंस घटनेचीही आठवण काढलीय.
येत्या ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होतील. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी राम जन्मभूमीवर उपस्थित होतील. इथे ते नागरिकांनाही संबोधित करणार आहेत. अयोध्येत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी साकेत विद्यापीठातून राम जन्मभूमीकडे रवाना होतील. यावेळी पंतप्रधान मोदी हनुमानगढीलाही भेट देतील. भूमी पूजन कार्यक्रमात जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील, असं सांगण्यात येत आहे. गेल्या ४०० वर्षांहून अधिक काळ बाबरी मशिद अयोध्येत होती आणि १९९२ साली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जमावानं ती उद्ध्वस्त केली हे आम्ही विसरू शकत नाही, असेही ओवैसी यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान कोरोना काळातच या कार्यक्रमाचं आयोजन होणार असल्यानं या कार्यक्रमासाठी आमंत्रितांची संख्या २०० पर्यंत मर्यादित ठेवण्यात आलीय. भूमी पूजनाच्या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या उपस्थितांच्या यादीत ५० साधू-संत, ५० अधिकारी आणि ५० जण विश्व हिंदू परिषद (VHP) आणि न्यासाशी संबंधित असतील. ‘राम जन्मभूमी ट्रस्ट’कडून रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी, कुमार मंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा, राहुल बजाज, राजीव बजाज यांसारख्या १० मोठ्या उद्योगपतींनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण धाडण्यात आलंय. भूमी पूजनाच्या कार्यक्रमात देशातील ५० नेत्यांचाही समावेश असेल. देशातील वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना या कार्यक्रमाचं निमंत्रण धाडण्यात आलंय. किंबहुना पंतप्रधानांच्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान कार्यालयाकडून ठरवण्यात आलेल्या ५ ऑगस्ट याच मुहूर्ताच निवड या कार्यक्रमसाठी करण्यात आलीय.