MaharashtraNewsUpdate : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा आगामी लॉकडाऊनला विरोध

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ३१ जुलैनंतर लॉकडाउन वाढवला तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असा इशारा दिला आहे. यावेळी माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ३१ जुलैनंतर लॉकडाउन वाढवला जाऊ नये असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, “पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम असून आता लॉकडाउन मोडावा लागेल. ३१ जुलैनंतर राज्यात लॉकडाउन वाढवला जाऊ नये अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन विरोध करु. सरकारने गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवू नये. माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी आहे”. लोकांना लॉकडाउनमुळे होत असलेल्या मानसिक त्रासाची जाणीव झाली आहे. सरकारने लोकांच्या वागणुकीवरुन परिस्थिती समजून घ्यावी असंही ते म्हणाले आहेत. राज्य सरकारने आमदार, खासदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींची करोना चाचणी करावी. चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्यांना क्वारंटाइन करावं, मात्र चाचणी निगेटिव्ह येणाऱ्यांना फिरायला रानमोकळं करा असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.