CoronaEffectIndia : ना सरकार , ना समाज , ना नातेवाईक “तिने” हातगाडीवर नेला पतीचा मृतदेह !!

देशभरात कोरोनाची समाजातील दहशत काही केल्या कमी होताना दिसत नसून कर्नाटकच्या बेळगावमधून अशीच हृदय हेलावणारे वृत्त पुढे आले आहे. एका महिलेवर आपल्या पतीचा मृतदेह एका कापडात गुंडाळून हातगाडीवर लादून स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्याची वेळ आली. अंत्यसंस्कारासाठी या महिलेला कुणीही मदतीला आले नाही. सर्वानांच करोना विषाणूची भीती असल्याने कुणीही अंत्यसंस्कारासाठी पुढे न आल्याने या महिलेला आपल्या पतीचा मृतदेह स्मशानभूमीत न्यावा लागला.
सर्वांना मदतीची याचना करून कोणीही पुढे येत नसल्याने या महिलेने तिच्या दोन मुलांची मदत घेतली. त्यांच्या मदतीने पतीचे प्रेत एका कापडात गुंडाळून त्यांनी ते चारचाकी हातगाडीवर लादले. त्यानंतर या महिलेने हा मतदेह स्मशानभूमीपर्यंत नेला. ही माहिती स्वत: महिलेने दिली आहे. या महिलेच्या पतीचा मृत्यू करोनामुळेच झाला असावा असे सर्वांना वाटत होते. महिलेचे कुटुंब अत्यंत गरीब होते. हे कुटुंब आर्थिक आव्हांनांशी लढत असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली. या कुटुंबाकडे पैसे नसल्याने या महिलेला आपल्या पतीचा मृतदेह चारचाकी हातगाडीवर लादून स्मशानभूमीपर्यंत न्यावा लागला.
या महिलेच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदाशिव हिरत्ती असे या महिलेच्या पतीचे नाव होते. बुधवारी रात्री ५५ वर्षीय सदाशिव हिरत्ती यांचा घरीच मृत्यू झाला. त्यावेळी त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी घरी नव्हते. जेव्हा सदाशिव यांची पत्नी आणि मुले घरी आले तेव्हा त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र सदाशिव यांनी त्यांना उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांना दरवाजा तोडावा लागला. दरवाजा तोडून सदाशिव यांची पत्नी आणि मुले घरात गेले. मात्र सदाशिव यांचा घरातील खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याचे त्यांना आढळले. सदाशिव यांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजारामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. या महिलेला कुठूनही मदत न मिळाल्याने शेवटी महिलेने आपल्या पतीचे शव कपड्यात गुंडाळले आणि तो चारचाकी हातगाडीवर लादून तो स्मशानभूमीत नेला, अशी माहिती एका स्थानिक रहिवाशाने दिली.