MaharashtraNewsUpdate : राम मंदिर बांधण्याच्या निर्णयावरून शरद पवारांचा मोदी सरकारला असाही चिमटा… !!

देशात सर्वत्र कोरोनाची चर्चा चालू असतानाच अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्ट ही तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटायला लागले आहेत. यावर भाष्य करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला शाब्दिक चिमटा काढला आहे. यावर आपली प्रतिक्रिया नोंदविताना पवार म्हणाले कि , कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं ते ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं कोरोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. खा. शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते.
पवार पुढे म्हणाले कि , कोरोनामुळं जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. या संकटात सापडलेल्या नागरिकांना कसं बाहेर काढायचं याबाबत आम्ही विचार करतोय. त्याला आम्ही प्रथम प्राधान्य देतोय. काहींना वाटतंय मंदिर बांधून करोना जाईल, म्हणून त्यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असावा, याबाबत मला माहिती नाही, राज्य आणि केंद्र सराकारनं लोकांना करोना संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. असं मत शरद पवार यांनी मांडलं आहे. देशातील धोकादायक शहरांत सोलापूरचा समावेश होतो. सोलापूरचा मृत्यूदरही चिंता वाढवणारा आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. नियोजत भवनात शरद पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैढक घेण्यात आली.
राज्यातील मृत्यूदरापेक्षा सोलापूरचा मृत्यूदर अधिक आहे. बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील स्थिती चिंता वाढवणारी आहे. या तीन तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता २१ किंवा २२ तारखेला सोलापूरचा दौरा करणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. सोलापूर हे संकटावर मात करणारं शहर आहे. सोलापूरचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांचं राज्य असताना अगदी मर्यादित काळासाठी ब्रिटिशांची सत्ता घालवण्यात एकच शहर यशस्वी झालं होतं ते म्हणजे सोलापूर, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवार असेही म्हणाले…
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या कानावर घालून सोलापूरसाठी अधिक मदत देण्याचे अभिवचन देताना पवार म्हणाले कि , खासगी रुग्णांलयातील रुग्णांच्या बिलाची तपासणी सरकारी ऑडिटर मार्फत होणार असून त्यामुळे रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अवाजवी बिलावर नक्कीच आळा बसेल. दरम्यान सोलापूरसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून मदत मिळतेय का याचा आढावा घेण्यात येईल. सोलापूर शहराच्या पूर्व भागात विडी कामगार, हातमाग कामगार असल्यामुळं रुग्ण वाढले असून त्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. शहरात अँटीजन टेस्ट सुरु करण्यात आल्या असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी 80 रेमडेसिवीर इंजेक्शन दान
आपल्या दौऱ्यादरम्यान आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले कि , सोलापूर जिल्ह्याशी माझे ऋणानुबंध आहेत, या शहराचे मी काही देणे लागतो. यासाठीच सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून 500 ते 600 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध केले आहेत. त्यातील सोलापूर जिल्ह्यासाठी 80 इंजेक्शन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सुपुर्द केली आहेत. याचा उपयोग गरीब आणि गरजू रूग्णांसाठी करावा, असे श्री. पवार यांनी यावेळी सांगितले. हे इंजेक्शन कोरोनाबाधित गंभीर रूग्णांवर उपयुक्त आहे. त्यानुसार याचा वापर करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन कार्यालयाच्या सभागृहात कोरोना उपाययोजनाबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीलाही पवार यांनी मार्गदर्शन केले. . यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते.