KolhapurCoronaNewsUpdate : कोल्हापुरात आजपासून कडक लॉकडाऊन, दोन आठवड्याची जिल्हाबंदी

मुंबई पुण्यानंतर आता राज्यातील वेगवेगळ्या शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असून गेल्या आठ दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत आहे. शनिवारी दीडशेवर रुग्ण आढळल्याने जिल्ह्याने आतापर्यंत दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पंधरा दिवस कोल्हापुरात इतर जिल्ह्यातील व्यक्तींना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी दिले जाणारे ई-पास तातडीने बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान पहिल्या टप्यात कोल्हापूर जिल्ह्यात करोना संसर्गाचे प्रमाण अतिशय कमी होते. पण मुंबई, पुणे आणि इतर रेडझोन भागातून लोक परतू लागल्याने संसर्ग वाढत गेला. गेल्या चार पाच दिवसांत तर करोना च्या आकडेवारीने कहरच केला. पूर्वी रोज पंधरा वीस करोना बाधित आढळत होते. पण चार दिवसात रोज दोनशे ते तीनशे रुग्ण आढळू लागले. त्यामुळे आठ दिवसांतच बाधितांच्या संख्यने दोन हजाराचा टप्पा पार केला. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्याची मागणी होऊ लागली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्याची घोषणा केली. २० ते २६ जुलै या दरम्यान सात दिवस दूध व औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यानुसार सोमवार पासून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
कोल्हापुरात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींमुळे करोना संसर्ग वाढत आहे. मुंबईहून मोठ्या प्रमाणात नागरिक कोल्हापुरात आले आहेत. यामुळे येत्या दोन आठवड्यात जिल्ह्यात कुणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी ई-पास दिले जातात. ते तातडीने बंद करण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. आजपासूनच त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. केवळ वैद्यकीय तातडीची खात्री झाल्यास व सदर व्यक्ती कोल्हापूर क्षेत्रातील (आधारकार्ड पत्यानुसार) असेल तरच परवानगी देण्यात येईल. तसेच मालवाहतूक व अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा देत असलेल्या व्यक्तींना व वाहनांना सुट देण्यात येणार आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहेत. यामुळे १५ दिवस परजिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीला कोल्हापुरात येता येणार नाही.