CoronaIndiaUpdate : लॉक -अनलॉकच्या खेळात देशात कोरोनाग्रस्तांची चिंताजनक वाढ

देशात सर्वत्र लॉक -अनलॉकचा खेळ चालू असतानाच कोरोनानं भारतात आतापर्यंत 10 लाखाचा टप्पा पार केला आहे. दरम्यान सरकारकडून मात्र सातत्याने रिकव्हरी रेटबाबत चर्चा केली जात असून दावा केला जात आहे कि , कोणीही घाबरण्याचे कारण नाही. जुलै महिन्यात कोरोना विषाणूचा वेग सर्वात चिंताजनक आहे. या महिन्याच्या अवघ्या 16 दिवसांत देशात 4.15 लाख नवीन कोरोनाच्या केसेस समोर आल्या आहेत. जुलैमध्ये दररोज 500-600 मृत्यूची नोंद होत आहे.
वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, काल 16 जुलै रोजी कोरोनाच्या 35 हजार नवीन केसेस समोर आल्या आहेत. एका दिवसात भारतात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं नवीन रुग्ण आढळल्यानं काहीशी भीती व्यक्त केली जात आहे. भारत आता ब्राझील आणि अमेरिकेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिकेत दरदिवशी साधारण 60 तर ब्राझिलमध्ये सरासरी 40 हजार नवीन कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत त्यानंतर भारताचा क्रमांक लागत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.
कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत जगभरात तिसऱ्या क्रमांकाचा देश असून देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1005637 लाखावर पोहोचली आहे. अमेरिकेत 3695025 कोरोनाग्रस्त आहेत तर ब्राझिलमध्ये 2014738 रुग्ण आहेत. जगभर कोरोनाचे संक्रमण आणि संसर्ग झपाट्याने वाढत असून याबाबत सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असताना भारत सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे भारतात केवळ 6 दिवसांमध्ये 2 लाखहून अधिक रुग्ण वाढले असून मृत्यूंची संख्या 25000 हुन अधिक झाली आहे. अमेरिका आणि ब्राझिलच्या तुलनेत हा संसर्ग पसरण्याचा वेग भारतात जास्त असल्याचं आकडे सांगत आहेत.
भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी केरळमध्ये आढळला होता. त्यानंतर एक लाख कोरोनाग्रस्तांचा आकडा होण्यासाठी जवळपास 110 दिवस लागले होते. त्यानंतर पुढच्या 14 दिवसांमध्ये एक लाखवरून दोन लाखांवर वेग पोहोचला. 149 दिवसांनी म्हणजेच 26 जून रोजी देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 लाखहून अधिक पोहोचली होती. दरम्यान 27 जून ते 17 जुलै या कालावधीमध्ये उर्वरित 5 लाख नवीन प्रकरण समोर आली आहेत. केवळ 20 दिवसांमध्ये आणखीन 5 लाख लोकांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. आज कोरोनाग्रस्तांचा आकाडा 10 लाखांवर पोहोचला आहे.