CoronaEffectUpdate : डॉक्टरांचा मृत्यूदर अधिक , इंडियन मेडिकल असोसिएशनचा देशातील सर्व डॉक्टरांसाठी रेड अलर्ट,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने देशातील सर्व सदस्य डॉक्टरांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. संकटकाळात आघाडीवर लढणाऱ्या डॉक्टरांपैकी आतापर्यंत 99 डॉक्टरांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. तर आतापर्यंत 1302 डॉक्टरांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांपेक्षा डॉक्टरांचा मृत्युदर जास्त असल्याचे आयएमएने म्हटले आहे.
आयएमएने पुढे म्हटले आहे कि , सरकारने अद्याप किती डॉक्टरांचे मृत्यू झाले हे जाहीर केले नाही. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती फार वेगळी आहे. याचसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने देशातील सर्व सदस्य डॉक्टरांकडून वैयक्तीक फॉर्म भरुन घेतल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संघटनेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार देशभरात आतापर्यंत 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर 1302 डॉक्टरांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. 99 पैकी 73 डॉक्टरांचं वय हे 50 च्या पुढील आहे. तर 19 डॉक्टर हे 35 ते 50 वयोगटातील आहे. 1302 संक्रमित डॉक्टरांपैकी 586 डॉक्टर्स हे प्रॅक्टीसिंग आहे तर 566 डॉक्टर्स हे निवासी आहेत. धक्कादायक म्हणजे डॉक्टरांचा मृत्युदर हा 8 ते 9 टक्के असल्याची माहिती माहिती डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी एबीपी ऑनलाईनशी बोलताना दिली.
दरम्यान सरकारी डॉक्टरांप्रमाणे खासगी डॉक्टरही कोरोना काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांना सेवा देत आहे. मात्र, डॉक्टरांना मिळणारे पीपीई किट दर्जेदार नसल्याने त्यांना कोरोना विषाणूची बाधा होत आहे. डॉ. उत्तुरे म्हणाले, की यावर सरकारचं कुठलही कंट्रोल नाही. कोरोना काळात पीपीई किटची निर्मिती कुणीही करत आहे. त्यामुळे त्यांच्या दर्जाबद्दल शंका आहे. यासाठी सरकारकडून कोणत्याही गाईडलाईन्स नाहीत. त्यामुळे एकप्रकारे डॉक्टरांच्या जीवाशी खेळ केल्यासारखेचं आहे. त्यामुळे सरकारने यासाठी अधिकृत नियमावली करण्याची मागणीही संघटनेने केली असल्याची माहिती डॉ. उत्तुरे यांनी दिली. डॉक्टरांच्या मृत्युंमध्ये फॅमिली डॉक्टर्सचा जास्त समावेश असल्याचंही पुढं आलं आहे.
डॉक्टरांसाठी रेड अलर्ट
कोरोना काळात झालेल्या डॉक्टरांची मृत्यूची गंभीर दखल इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतली आहे. त्याचसाठी संघटनेच्या सर्व डॉक्टरांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकाला काही उपाययोजना सांगितल्या आहेत. सोबतचं सर्व डॉक्टरांना सुरक्षेच्या दृष्टीने माहिती पुरवण्याचं काम सुरू केलं आहे. सर्व डॉक्टरांनी काळजी घेण्याच्या सूचनाही यात देण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणू संसर्ग देशात झपाट्याने वाढत आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी सरकार, प्रशासन, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी असे सर्वजण अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, या कोरोना विषाणू सोबतच्या युद्धात आघाडीवर लढत आहेत ते म्हणजे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी. याचा फटकाही त्यांना अधिक बसत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या संदर्भात संघटनेच्या सर्व सदस्यांना आता रेड अलर्ट जारी केला आहे.