VidarbhaNewsUpdate : CoronaEffect : नवरदेवाला झाला २५ हजाराचा दंड आणि गल्ली झाली क्वारंटाईन !!

वर्धा जिल्ह्यात पिपरी मेघे येथे झालेला विवाह सोहळातील नवरदेव, नवरीसह सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर लग्नघरासह आजुबाजूची तब्बल सात घरे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. एवढंच नाही तर पोलिसांनीही नवरदेवावर दंडात्मक कारवाई केली आहे. पोलिसांनी नवरदेवावर सुमारे 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या लग्नाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिपरी येथील विवाह सोहळ्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. धक्कादायक म्हणजे लग्नघरी कंदुरीच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. कंदुरीच्या कार्यक्रमाला तोबा गर्दी झाली होती. सोशल डिस्टंसिंगचा तर फज्जा उडाला होता. आता कंदुरीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांचा पोलिस आणि आरोग्य कर्मचारी शोध घेत आहेत. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या पार्श्वभूमीवर वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी नवा आदेश जारी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लग्न सोहळ्याबाबत नवी नियमावली जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार लग्नात 20 पेक्षा जास्त नातेवाईक सहभागी झाल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.