CoronaMaharashtraUpdate : गेल्या 24 तासात 6497 रुग्णांची वाढ , एकूण रुग्णसंख्या 2,60,924 ,रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ

गेल्या 24 तासांमध्ये 6497 रुग्णांची भर त्यात पडली. तर 193 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 4182 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,60,924 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 10,482 वर गेला आहे. दरम्यान अनलॉकनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. पण मृत्यूदर फारसा वाढलेला नाही , हा त्यातल्या त्यात दिलासा म्हणावा लागेल. आतापर्यंत महाराष्ट्रात अडीच लाखांवर कोरोना रुग्ण सापडले असले तरी त्यातले 1,44,507 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण सध्या ठाणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर मुंबई आणि पुणे जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. ठाणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळते आहे.
अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार
मुंबई 22900
ठाणे 34430
पुणे 22196
पालघर 4917
रायगड 4525
दरम्यान मुंबईतील कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांवर नेण्याचे उद्दिष्ट गाठल्याने ते सिद्ध झाले आहे. यासोबत महत्त्वाची बाब म्हणजे उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही आता 70 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, अशी दिलासादायक माहिती समोर आली आहे. महानगरपालिका प्रशासनाने दिनांक 22 जून 2020 रोजी मिशन झिरो या शीघ्र कृती अभियानाचा प्रारंभ केला होता. त्यावेळी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 37 दिवस होता. हा कालावधी 2 ते 3 आठवड्यांत 50 दिवसांवर नेण्याचे लक्ष्य असल्याचे महापालिका आयुक्त चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घोषित केले होते. तसेच त्यादृष्टीने प्रशासनाने निश्चित केलेल्या आराखड्याची माहितीदेखील दिली होती. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 1 जुलै 2020 रोजी 42 दिवसांवर पोहोचला. तर आज (दिनांक 13 जुलै 2020) हा कालावधी 51 दिवसांचा आहे.