MumbaiCoronaUpdate : कोरोनाशी झुंज देताना सहाय्यक आयुक्त खैरनार यांचा कोरोनाने घेतला बळी !!

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईची स्थिती अधिक चिंताजनक असून कोरोना विरुद्धच्या लढाईत मुंबई पालिकेतील एक धडाडीचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचे आज निधन झाले आहे. मुंबई पालिका एच पूर्व विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच आज त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत एच पूर्व विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे. खैरनार यांच्या निधानाने पालिकेला फार मोठा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे एच पूर्व विभागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थानही येते . दरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यामुळे या भागात करोना संसर्गावर सर्वात वेगाने नियंत्रण मिळवण्यात आले. करोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणारा हा मुंबईतील पहिला विभाग ठरला. अर्थात या लढ्यात सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा सिंहाचा वाटा होता. खैरनार यांनी स्वतः कोरोना नियंत्रणासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्याला यश मिळाले मात्र या लढ्यात खैरनार स्वत: कोरोनाग्रस्त झाले आणि त्यात त्यांना प्राणास मुकावे लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेतील अनेक कर्मचारी आणि अधिकारी करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. एका आकडेवारीनुसार आतापर्यंत सुमारे १०० जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.