MaharashtraNewsUpdate : “महाजॉब्स” हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा : मुख्यमंत्री

देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की आणखी काही, महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखविले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेले “महाजॉब्स” हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे नमूद केले तसेच काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांसाठी मोबाईलवर “महाजॉब्स” नावाचे ॲप उपलब्ध करून देण्याची सुचनाही उद्योग विभागाला दिली.
राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्यासह उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, उद्योग विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे, राज्याच्या प्रत्येक भागातील उद्योजक आणि रोजगार संधीच्या शोधात असलेले भूमिपुत्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
महाजॉब्सच्या माध्यमातून राज्यातील उद्योजक, भूमिपुत्र यांच्या दोघांच्याही गरजा भागवल्या जाव्यात, उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ मिळावे तर युवकांना रोजगार. या समन्वयातून राज्याचा गतिमान पद्धतीने विकास होतांना घराघरात समाधान नांदावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, कोरोनाने आपल्यापुढे संकट निर्माण केले असले तरी काही गोष्टी निश्चित शिकवल्या आहेत. त्यामध्ये घराकडे आरोग्याकडे पाहण्याची शिकवण जशी कोरोनाने दिली तशीच आत्मनिर्भर होण्याचीही दिली आहे.
बेरोजगारी संपवण्याची संधी – सुभाष देसाई
उद्योग विभागाने केलेल्या पाहणीत राज्यातील उद्योगांत ५० हजार रोजगार उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या पोर्टलद्वारे नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यात शासनाने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. या महाजॉब्स पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, केमिकल आदी १७ क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्यातील ९५० व्यवसायांसाठी इच्छुक उमेदवार निवड करू शकतात. स्थानिक भूमिपुत्रांनांच नोकरीची संधी मिळावी यासाठी अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्राची अट यामध्ये आहे. याद्वारे राज्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी मदत होईल.
महाराष्ट्र प्रगतीकडे झेप घेईल- दिलीप वळसे पाटील
उद्योग, कामगार आणि कौशल्य विकास एकत्रित आल्याने महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्यास मदत होईल. या पोर्टलमधून नवे-जुने, कुशल-अकुशल कामगारांना कायमस्वरुपी नोकरी मिळेल, असे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. नवीन उद्योगांत सुसूत्रता येण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरेल. नवीन उद्योगांसाठी नवीन संधी निर्माण होत आहे. महास्वयं व महापोर्टलमध्ये होणाऱ्या नोंदणीची माहिती ऑनलाइन रोजगार मेळाव्यासाठी फायद्याची ठरेल. राज्यातील युवक-युवतींना या पोर्टलद्वारे नोकरीसाठी नक्कीच फायदा होईल, असे उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. यावेळी विको लॅबरोटरीज तसेच दीपक फर्टिलायझरने तत्काळ कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे नमूद केले. राज्यातील उद्योजक व तरुणांनी या पोर्टलचे स्वागत केले आहे. वेबपोर्टलचे अनावरण झाल्यानंतर काही तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी सुरू केली आहे.