CoronaIffect : पोलिसांनाही काम करणे झाले अवघड , अटक केलेली तरुणी निघाली पॉझिटिव्ह , १४ पोलीस क्वारंटाईन…

कोरोनामुळे पोलिसांनाही काम करणे जिकिरीचे आणि कठीण झाले आहे. अशाच एका प्रकरणात पोलिसांच्या ताब्यातील देहविक्री करणाऱ्या तरुणीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून त्यामुळे दोन अधिकाऱ्यांसह तब्बल एक डझन कॉन्स्टेबल क्वारंटाईन करण्यात आलं आहे. राजस्थानातील उदयपूर पोलिसांनी तीन महिला डीएसपीने दोन दिवसांपूर्वी पीटा कायद्यांतर्गत धडक कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी दहा तरुणांसह देहविक्री करणाऱ्या सात तरुणींना अटक केली होती. सातपैकी एक तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. कारण ही कारवाई पोलिसांच्या दोन पथकांनी केलीहोती. विशेष म्हंजे या तरुणीची जामिनावर मुक्तता झाली असून तिचा शोध घेणे आव्हान झाले आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी कि , एक जुलै रोजी रात्री सुखेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल रामलखनवर डीएसपी चेतना भाटी यांच्या नेतृत्त्वात पोलिसांच्या एक पथकाने छापा टाकून देहविक्री करणाऱ्या सात तरुणींना पोलिसांनी अटक केली होती. या सर्व तरुणींना पोलिस रिमांडमध्ये ठेवण्यात आलं होतं. यावेळी सर्व तरुणींची कोरोना टेस्ट करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तरुणींवर लक्ष ठेवण्यासाठी चार महिला कॉन्स्टेबलला तैनात करण्यात आलं होतं. दरम्यान, एका तरुणीचा कोरोना रिपोर्च पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत सहभागी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे त्यांच्या संपर्कातील लोकांनाच शोध घेणे मात्र अवघड झाले आहे.
दरम्यान एएसपी गोपाल स्वरूप मेवाडा यांनी सांगितलं की, डीएसपी चेतना भाटी यांच्या नेतृत्त्वात सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याच बरोबर सुखेर आणि घंटाघर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. आतापर्यंत एक डीएसपी, दोन एसएचओ आणि 11 पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या दोन कोरोना टेस्ट घेण्यात येणार आहे. सदर कोरोना पॉझिटिव्ह तरुणी दिल्लीची रहिवासी आहे. सध्या तिची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र, तरुणीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे. दुसरीकडे संबंधित तरुणी उदयपूरच्या बाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस तिचा मोबाईल लोकेशन ट्रेस करत आहेत.