MaharashtraNewsUpdate : ‘ मिशन बिगिन अगेन ‘ पण जरा सांभाळून , मुख्यमंत्री आणि पोलिसांचा असाही इशारा….

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात ‘ मिशन बिगिन अगेन ‘चा दुसरा टप्पा ३१ जुलैपर्यंत असेल, असे स्पष्ट केले असले तरी दुसऱ्या अर्थाने येत्या ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून या दरम्यान अनेक निर्बंध मात्र टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येणार आहेत. त्यामुळे आणखी एक महिना राज्यातील जनतेला टाळेबंदीतच काढावा लागणार आहे. राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यात १ जूनपासून केंद्राची नवी नियमावली आल्यानंतर राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू करण्यात आले. त्यात कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागांत बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले.
दरम्यान मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा ३० जून म्हणजेच उद्या संपत आहे. त्यामुळेच १ जुलैपासून पुढे काय, असा प्रश्न सामान्यांना होता. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्याला संबोधित करताना अनेक बाबी स्पष्ट केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने लॉकडाऊन उठवलं जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले होते. त्यानुसार आता शासनाकडून स्पष्टता आली आहे. सरकारने राज्यात ३१ जुलैपर्यंत मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. त्यात आधीपासून लागू असलेले बहुतेक नियम कायम राहणार आहेत. राज्यात लॉकडाऊन दरम्यान जिल्हाबंदी आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे. ही बंदी यापुढेही कायम राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सर्व भागात ये-जा करण्याची मुभा आहे ती मात्र कायम राहणार आहे. एसटीची मर्यादित सेवा राज्यात सुरू झाली आहे. ती यापुढेही तशीच राहणार आहे. राज्यात ३० जूननंतरही लॉकडाऊन कायम असणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊन मागे घेण्यात येणार नसला तरी राज्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये व अर्थचक्र गतीमान व्हावं यासाठी अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
राज्य सरकारने जनतेला काही प्रमाणात मोकळीक दिली असली तरी वाढते आकडे लक्षात घेता मुंबईकरांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. अन्यथा त्या भागात पुन्हा पूर्वीसारखाच कडक लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. दरम्यान मुंबई पोलिसांनीही १ जुलैनंतर नियमांचे पालन करण्याचं आवाहन मुंबईकरांना केलं आहे. राज्य सरकारतर्फे मिशन बिगीन अगेनअंतर्गंत अनेक परवानग्या देण्यात येत आहेत. असं असलं तरी करोनाचा धोका अद्याप कायम आहे. सर्वांच्या सुरक्षेसाठी सोशल डिस्टनसिंगचं पालन करावं व नियम पाळावेत, अशा सूचना मुंबई पोलिसांनी केल्या आहेत.
मुंबई पोलिसांच्या सूचना
१. फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच घराबाहेर पडा
२. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे.
३. घरापासून फक्त २ कि.मी.च्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. २ कि.मी. च्या बाहेर जाऊ नये.
४. व्यायामाची परवानगी घरापासून २ किमीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित
५. कार्यालयात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत 2 कि.मी. च्या बाहेर जाण्याची परवानगी आहे.
६. सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
७. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
८ सोशल डिस्टनसिंगचे निकष न पाळणारी दुकानं बंद करण्यात येतील.
९. रात्री ०९ ते पहाटे पाच दरम्यानच्या कर्फ्युमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल
१०. वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळून येणारी सर्व वाहने जप्त केली जातील.