“विदेशी महिलेचा मुलगा कधीही राष्ट्रभक्त होऊ शकत नाही..” खा. प्रज्ञासिंह ठाकूर यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य…

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विदेशी महिलेचा मुलगा कधीही राष्ट्रभक्त होऊ शकत नाही असे वक्तव्य त्यांनी भोपाळ इथं बोलतांना केलं. काँग्रेसने या वक्तव्याचा निषेध केला आहे. प्रज्ञासिंह म्हणाल्या, काँग्रेसला सभ्यता आणि संस्कृती याचं वावडं आहे. त्यांच्याकडे देशभक्ती नाही. त्यांच्यात कशी येणार देशभक्ती? कारण त्यांनी दोन दोन देशांचं सदस्यत्व घेतलं आहे. जे विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आले ते देशभक्त असूच शकत नाहीत अशी मुक्ताफळंही त्यांनी उळधळली आहेत.
या आधीही त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे भाजपलाही अडचणींचा सामना करावा लागला होता. नथुराम हा देशभक्त होता असं वक्तव्य केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांची जोरदार कानउघडनी केली होती. मी त्यांना मनातून कधीच माफ करू शकणार नाही असंही जाहीरपणे ते म्हणाले होते. त्यानंतर पक्षाने त्यांना फारसं महत्त्व दिलं नाही असंही म्हटलं जाते. त्यांच्या उमेदवारीपासूनच त्या वादात राहिल्या आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा पराभव करून त्या लोकसभेत भोपाळमधून निवडून आल्या होत्या. त्या वक्तव्याबद्दल पक्षाने त्यांना कारणेदाखवा नोटीसही बजावली होती. त्यानंतर त्यांनी त्याबद्दल माफीही मागितली होती. मात्र त्या फार काळ शांत बसल्या नाहीत. त्यानंतरही त्यांनी अनेकदा आपल्या वक्तव्यांनी वाद निर्माण केले आहेत.