मुलगी झाली म्हणून खवळलेल्या पतीचा पत्नीवर हल्ला , मध्ये पडलेला आरोग्य कर्मचारी जखमी…

मुलगी झाली म्हणून पतीने रुग्णालयातच आपल्या पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली आहे. दरम्यान त्याला अडवण्यास गेलेल्या सुरक्षारक्षकालाही त्याने मारहाण करत डोक्यात दगड मारून जखमी केले. बारामतीतील डोर्लेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी अर्चना कृष्णा काळे ही महिला दाखल झाली होती तिला पहिला मुलगा आहे आणि दुसरी मुलगी झाली. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कृष्णा काळेला मुलगी झाल्याची बातमी दिली. पण, आपल्याला मुलगी झाले याचा संताप कृष्णा काळेला झाला. त्यानंतर दारूच्या नशेत त्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात धिंगाणा घातला.
नवजात बाळाला जन्म दिलेल्या बायकोलाच मारहाण आणि शिवीगाळ केली. त्याच्या या कृत्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारीही संतप्त झाले. त्याला अटकाव करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी बाळू चव्हाण गेले असता त्यांना आरोपी कृष्णा काळे याने दगडाने मारहाण करीत गंभीर जखमी केले आहे. बाळू चव्हाण यांच्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर जखम झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी बारामती येथील सिल्वर ज्युबली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी कृष्णा काळे याच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. 353, 333, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.