CoronaEffectMaharashtra : देवेंद्र फडणवीस यांचे पुनः मुख्यमंत्र्यांना पत्र ….

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पत्र लिहून त्यात म्हटले आहे कि , ‘गेल्या तीन- साडेतीन महिन्यात किमान १००० मृत्यू मुंबईत झाले आहेत. मात्र, त्यांना अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेला नाही.’
या पत्रात फडणवीस यांनी म्हटले आहे कि , ‘रुग्णालयांबाहेर झालेल्या करोना रुग्णांचे मृत्यू अद्यापही दाखवण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेलं असूनही या रुग्णांचा आकडा अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. आकडेवारीची अचूकता हाच करोनाविरोधातील लढाईसाठी मुख्य आधार असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.’प्राथमिक संकलनातच आतापर्यंत किमान ४५० मृत्यू ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृत्यूच्या संख्येत एकतर त्याचदिवशी किंवा ७२ तासांत तशी नोंद होणे आवश्यक आहे. परंतू तीन महिने लोटले तरी मृत्यू रिपोर्ट न होता आणि ते लक्षात आल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करून ते मृत्यूसंख्येत अधिक करणे, ही अतिशय चुकीची रणनीती आहे.’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘करोनाविरूद्धच्या लढाईत कोणत्या आठवड्यात किती मृत्यू झाले, किती रूग्णसंख्या आढळली, संसर्ग (इन्फेक्शन) किती प्रमाणात झाले आहे, हे कळण्यासाठी आकडेवारी हा अतिशय महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. अचूक विश्लेषणाचा तो महत्त्वपूर्ण आधार आहे. या विश्लेषणातूनच आणि रणनीती आखून त्याला पायबंद घालणे शक्य आहे. त्यामुळे नोंदी अचूक ठेवण्याचा आग्रह सातत्याने असला पाहिजे. त्यामुळं ही विलंबाची पद्धत बंद करून अचूक आकडेवारी हाती येईल आणि त्याचे तत्काळ रिपोर्टिंग होईल, याचा आग्रह आपण धरला पाहिजे. त्यादिशेने योग्य त्या सूचना आपण संबंधितांना द्याल,’ असेही या पत्रात म्हटले आहे.