CoronaMaharashtraUpdate : राज्यातील 1034 कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू , 49 पोलिसांचा मृत्यू

राज्य पोलीस दलात गेल्या 24 तासात आणखीन एका कोरोनाग्रस्त पोलिसांचा मृत्यू झाला असून यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांचा आकडा 49 वर गेला आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही कोरोनाबधित 1034 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 118 पोलीस अधिकारी तर 916 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता पर्यंत राज्यात 2 पोलीस अधिकारी व 47 पोलीस कर्मचारी अशा 49 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईतल्या पोलीस दलातली संख्या सर्वाधिक आहे. मुंबईतील 33 पोलीस (Mumbai Police) व 1 अधिकारी अशा एकूण 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 34 हजार 412 गुन्हे नोंदविण्यात आले. मुंबई वगळता क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 740 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 279 घटना घडल्या असून या प्रकरणी आतापर्यंत 858 जणांना अटक करण्यात आलेली आहे. कोविड 19 च्या संदर्भात तब्बल 1 लाख 4 हजार 351 कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले असून अवैद्य वाहतुकीच्या 1335 प्रकरणात 27481 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यन्त 84161 वाहन जप्त करण्यात आली असून तब्बल 8 कोटी 64 लाख 19 हजारांचा दंड पोलिसांनी थोटावला आहे.
याशिवाय राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 52 घटना घडल्या असून 86 पोलीस हे जखमी झाले आहेत. राज्यात सध्या एकूण 109 रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास 3548 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 99 हजार 280 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच 6 लाख 19 हजार व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 33 पोलीस व १ अधिकारी अशा एकूण 34, पुणे 3 सोलापूर शहर 2 नाशिक ग्रामीण 3 , ए.टी.एस. 1 , मुंबई रेल्वे 2 , ठाणे ग्रामीण 2 , जळगाव ग्रामीण 1 , पालघर 1 असा समावेश आहे.