WorldCoronaUpdate : जगातील ८१ देशात येत आहे कोरोनाचो दुसरी लाट , कोरोनापेक्षाही जागतिक पातळीवरील एकजुटीचा अभाव हाच मोठा धोका : टेड्रोस घेब्रेयेसस

WHO emphasizes that dexamethasone should only be used for patients with severe or critical #COVID19 under close clinical supervision. No evidence this drug works for patients with mild disease or as a preventive measure, and it could cause harm: Director-General of WHO (file pic) pic.twitter.com/nQGzImjY3s
— ANI (@ANI) June 22, 2020
जगातील ८१ देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत असून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. जवळपास जगभरात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती असताना जागतिक आरोग्य संघटनेने संसर्गाच्या मुद्यावर नेत्यांनी राजकारण न करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. कोरोनापेक्षा जागतिक पातळीवरील एकजुटीचा अभाव हाच मोठा धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले.
ट्रेडोस यांनी दुबईत आयोजित केलेल्या जागतिक सरकार संमेलनास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. त्यावेळी त्यांनी म्हटले की, करोनाचा संसर्ग फैलावत आहे. करोनाचा आपण सामना करत असलो तरी सगळ्यात मोठा धोका जागतिक एकजूट नसणे आणि जागतिक पातळीवर नेतृत्वाची कमतरता असणे हे दोन मोठे संकट सध्या आहे. दुभंगलेल्या जगासह आपण करोना महासाथीच्या आजारावर मात करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. करोना संसर्गाच्या मुद्यावर चीन आणि अमेरिकेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेवर गंभीर आरोप करताना चीनला झुकतं माप दिले असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्यत्वही सोडले. अमेरिका-चीनच्या वादामुळे जगात दोन गट निर्माण झाले असल्याचे चित्र तयार झाले आहे.
टेड्रोस यांनी सांगितले की, जगामध्ये करोना व्हायरसने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दहा लाखांवर पोहचण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला. मात्र, मागील आठ दिवसांमध्ये जवळपास इतकेच बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती त्यांनी दिली. करोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणीही राजकारण न करण्याचे आवाहन त्यांनी केले. डेक्सामेथासोन औषधाचा वापर फक्त गंभीर आजारी असलेल्या करोनाबाधितावर करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सामान्यपणे करोनाबाधित असलेल्या रुग्णांवर हे औषध कितपत प्रभावी ठरेल, याबाबत काहीही समोर आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
हळू हळू जनजीवन येतेय पूर्वपदावर….
दरम्यान, जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने जगभरात ९० लाखाजणांना करोनाची बाधा झाली असल्याचे म्हटले आहे. तर, चार लाख ६८ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची संख्या यापेक्षाही अधिक असल्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली असली तरी करोना विषाणूच्या उद्रेकानंतर न्यूयॉर्कमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू असून सोमवारपासून वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील कार्यालयांसह शहरातील प्रमुख ठिकाणे पुन्हा खुली होणार आहेत. तीन महिन्यांनंतर प्रथमच न्यूयॉर्कमधील नागरिक हॉटेलमध्ये जाऊ शकणार आहेत, खरेदीदार पुन्हा एकदा शहरातील दुकाने पालथी घालू शकणार आहेत. केशकर्तनालयांकडे अनेकांची पावले वळतील आणि घरातील चार भिंती बंदिस्त असलेली लहान मुले क्रीडांगणांत धाव घेऊ शकतील. अनेक कर्मचारी घरूनच काम करणार असले, तरी काही कर्मचारी कार्यालयात परतणार आहेत.