CoronaMaharashtraUpdate : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येबाबत पारदर्शकतेचा अभाव , देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची हाताबाहेर जात असलेली स्थिती, ऑक्सिजनअभावी रूग्णांचे मृत्यू आणि कोरोना मृत्यूसंख्या दाखविण्यात अद्यापही पारदर्शितेचा अभाव याबाबींकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना पत्र…@CMOMaharashtra pic.twitter.com/UybgDqYhvC
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 20, 2020
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात मुंबई आणि महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. ऑक्सिजन अभावी करोनाचे रुग्ण आणि करोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या दाखवण्याबाबत अद्यापही पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला आहे.
फडणवीस यांनी म्हटले आहे कि , मुंबई व महाराष्ट्रातील करोनाची स्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत आहे. १९ जून रोजी महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वाधिक ३, ८२७ रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत सर्वाधिक बळींची संख्या ११४ इतकी नोंदवली आहे. १८ जूनपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला, तर राज्यातील एकूण करोना रुग्णांच्या संख्येत ५२.१८ टक्के वाटा एकट्या मुंबईचा आहे. मुंबई व एमएमआर क्षेत्राचा विचार केला, तर हा वाटा ७३.८५ टक्के इतका आहे. मुंबईचा मृत्यूदर हा ५.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे, असं फडणवीस यांनी मुंबईच्या वाढत्या मृत्यूदराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गेले तीन महिने सातत्याने करोना बळींची संख्या लपवली जात होती. त्याबाबत सूचित केल्यानंतर एकाच दिवशी राज्यभरातील बळीची संख्या १३२८नं वाढली आहे. तरी नवीन बळींच्या संख्येत जूनच्या या १८ दिवसांत महाराष्ट्रात ३६.१६ टक्क्यांनी वाढ झाली असून ती वाढ ३५.१६ टक्के इतकी आहे. असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
मुंबईतील केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सुमारे १० रुग्णांचा ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानं मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. करोनाच्या काळात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रांची निगा राखणे अतिशय आवश्यक आहे. यापूर्वीसुद्धा मे महिन्यात जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात १२ जणांना ऑक्सिजनच्या यंत्रणेतील बिघाडामुळे प्राणास मुकावे लागले. हे आरोग्य यंत्रणेतील गंभीर दोष दाखवितात. आपण स्वतः या सर्व प्रकारांत लक्ष घालावे आणि हे दोष दूर करावेत”, याबाबतही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केले.