Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaChinaDispute : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर  आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मोदींनी लडाखमधील स्थितीबाबत माहिती दिली. लडाखमध्ये भारतीय सीमेत चिनी सैनिकांनी कुठेही घुसखोरी झालेली नाही आणि भारताच्या कुठल्याही चौकीवर ताबा मिळवलेला नाही, असा खुलासा करताना मोदी म्हणाले देशाच्या जवानांवर जनतेचा विश्वास आहे आणि जनता या जवानांसोबत आहे.

भारताला मैत्री आणि शांतता हवी आहे. पण देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला ठेच पोहोचू देणार नाही. कुठल्याही परकीय दबावापुढे भारत झुकणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक असेल त्यासाठी वेगाने पावलं उचलली जातील, असं मोदींनी सांगितलं. भारत सीमांच्या सुरक्षेसाठी सक्षम आहे. कुणीही भारताच्या एक इंच जागेवर ताबा मिळवण्याची हिंमत करू शकत नाही, असं मोदी म्हणाले.

गलवानमध्ये ना कुणी भारतीय सीमेत घुसले  ना कुणी चौक्यांवर ताबा मिळवला. लडाखमध्ये आपले २० जवान शहीद झाले. पण ज्यांनी देशाकडे वाकडी नजर करून बघितलं त्यांना शहीद जवानांनी धडा शिकवला. भारतीय सैन्य देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे, अशी ग्वाही मोदींनी जनतेला दिली. तसंच कुठल्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सैन्याला मोकळीक देण्यात आली आहे, मोदी म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून सीमांच्या सुरक्षेसाठी सीमा भागात पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. नव्या पायभूत सुविधांमुळे प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) गस्त घालण्याची लष्कराची क्षमताही वाढली आहे. सीमा भागातील पायाभूत सुविधांमुळे ज्या ठिकाणी नजर जात नव्हती आता तिथे लष्कराला लक्ष ठेवण्यास मदत होत आहे. आतापर्यंत ज्यांना कुणी आडवत नव्हतं, टोकत नव्हतं त्यांना आता पावला पावलांवर रोखलं जातंय आणि टोकलं जातंय. यामुळे तणाव वाढतोय. पण एलएसीवर चीनने जे कृत्य केलं आहे यामुळे संपूर्ण देशात संताप आणि आक्रोश आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी या बैठकीत हीच भावना व्यक्त केली, असं मोदींनी सांगतिलं.

सोनिया गांधी

दरम्यान, भारत-चीन तणावात गुप्तचर यंत्रणांचे कुठल्याही प्रकारे अपयश नाही, असं सांगत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी विरोधांचे आरोप फेटाळून लावले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लडाखमधील घटनेवर प्रश्न उपस्थित केले होते. गुप्तचर यंत्रणांचे हे अपयश नाही का? सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. सरकारने चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच सर्वपक्षीय बैठ घ्यायला हवी होती, असं सोनिया गांधी म्हणाल्या. तसंच सध्या लडाखमध्ये काय स्थिती आहे, याची माहिती देशाला कळलीच पाहिजे. सर्वपक्षांना माहिती दिली गेली पाहिजे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि , भारताला शांतता हवी आहे. पण याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा मूळ स्वभाव हा विश्वासघातचा आहे. भारत बलवान आहे आणि दुबळा नाही. शत्रूचे डोळे काढून हातात देण्याची सरकारमध्ये क्षमता आहे.  आपण सगळे एक आहोत. आम्ही पंतप्रधान मोदींच्या सोबत आहोत. लष्कराचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत.

जवानांच्या बलिदानाचा सन्मान झाला पाहिजे. जवानांनी शस्त्र ठेवावेत की नाही हे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित केलं जातं. यामुळे अशा संवेदनशील प्रकरणी कराराचे पालन करणं गरजेचं आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. दरम्यान भारत-चीनमध्ये झालेल्या पंचशील कराराचे पालन झाले पाहिजे, असे मत माकप नेते सीताराम येच्युरी व्यक्त केले. तर भारताने अमेरिकेच्या आहारी जाऊ नये अशी भूमिका डी राजा यांनी व्यक्त केली.  यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार , ममता बॅनर्जी ,  बीजू जनता दलाचे पिनाकी मिश्रा आदींनी आपले मत व्यक्त केले. यावेळी सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींसह उपस्थित नेत्यांनी लडाखमध्ये शहीद झालेल्या जवानांना वाहिली आदरांजली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!