MumbaiNewsUpdate : कोरोनामुळे आणखी तीन पोलिसांचा मृत्यू , आयपीएस अधिकाऱ्यालाही कोरोनाची बाधा

राज्यात आणि मुंबईत कोरोनाचा कहर चालूच असून कोरोनामुळे दिवसभरात ३ पोलिसांचा मृत्यू झाला. मुंबई पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे. मुंबईमध्ये सोमवारी १ हजार ०६६ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५९ हजार २०१ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २ हजार २४८ वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हजारापेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. सोमवारी मुंबईमध्ये ५८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ३९ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३७ पुरुष तर २१ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २५ जण हे ६० वर्षांवरील, तर ३० जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.
गेल्या २४ तासांत तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं मुंबई पोलिस दलातील करोनाने निधन झालेल्यांची संख्या ३०वर पोहोचली आहे. तर, मुंबई पोलिस दलातील एका आयपीएस अधिकाऱ्यालाही करोनाची लागण झाली आहे. अंधेरी पोलिस ठाणे, निर्मल नगर पोलीस ठाण्ये, जोगेश्वरी पोलिस ठाणे येथील पोलिस ठाण्यात हे पोलिस कर्मचारी कार्यरत होते. गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिस दलात करोनाची बाधा झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या हळुहळू वाढत आहे. मुंबई पोलिस दलातील सुमारे दोन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १३००हून अधिक उपचारानंतर करोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुण्यात दिवसभरात २३४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार ८९० वर गेली आहे. तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. तर पुण्यात आतापर्यंत ४५८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे. कोरोनावर उपचार घेणाऱ्या २३६ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ६ हजार ४४६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरात ६८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १ हजार २४६ वर पोहोचली आहे. तर महानगर पालिकेच्या हद्दीतील एकाचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या १ हजार २४६ वर पोहचली आहे. तर मृतांची एकूण संख्या ४१ वर गेली आहे. आज ६१ जण करोना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत ८०० पेक्षा अधिक जण करोनामुक्त झाले आहेत.