IndiaNewsUpdate : शाब्बास मोदी सरकार : लॉकडाऊनच्या काळातही श्रमिक रेल्वेतून मिळवला ३६० कोटींचा महसूल !!

देशात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून केंद्र सरकारने जरी केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व सेवा ठप्प असल्या तरी रेल्वेने मात्र या काळातही ३६० कोटी रुपयांची कामे करण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे हि रक्कम विविध भागात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी ज्या श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या त्यातून कमावण्यात आली आहे. श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये प्रति कामगार ६०० रुपये भाडे आकारलं गेले होते. भारतीय रेल्वेने याबाबत संबंधित सोमवारी माहिती दिली. १ मेपासून सुरू असलेल्या या गाड्यांद्वारे सुमारे ६० लाख कामगारांना त्यांच्या गंतव्यस्थानी नेण्यात आले असल्याचे रेल्वेने म्हटलं आहे. त्यातून सुमारे ३६० कोटी रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती रेल्वेने दिली.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार , प्रवासी कामगारांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी भारतीय रेल्वेने आतापर्यंत ४४५० श्रमिक स्पेशल ट्रेन चालवल्या होत्या या श्रमिक स्पेशल ट्रेनचे सरासरी भाडे ६०० रुपये प्रति प्रवासी होते. ही मेल एक्स्प्रेस ट्रेनचे सामान्य भाडे आहे. या गाड्यांच्या माध्यमातून आम्ही सुमारे ६० लाख लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवलं. त्यांच्याकडून १५ टक्के रक्कम वसूल करण्यात आली. तर ८५ टक्के रक्कम केंद्र सरकारने भरली.
दरम्यान एका श्रमिक स्पेशल ट्रेनची परिचालन किंमत सुमारे ७५ ते ८० लाख रुपये असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं. बहुतेक स्थलांतरित मजूर त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचले आहेत. खूप कमी कामगार आहेत ज्यांना आता त्यांच्या घरी परत जायचं आहे. उर्वरित स्थलांतरित मजुरांसाठी आम्ही राज्य सरकारांना त्यांच्या गरजेनुसार ट्रेनची मागणी ३ जूनपर्यंत सादर करण्यास सांगितलं होतं. आतापर्यंत आम्हाला १७१ गाड्या उपलब्ध करण्यास सांगण्यात आलं आहे. यादव म्हणाले, १४ जूनपर्यंत आम्ही २२२ श्रमिक स्पेशल गाड्या चालवल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आम्ही पुन्हा राज्य सरकारांना त्यांच्या जादा गाड्यांची मागणी करण्यास सांगितलं आहे.