CoronaVirusUpdate : देशात १,४५, ७७९ जणांवर उपचार सुरू , १,५४, ३३० जणांना डिस्चार्ज , ८८८४ जणांचा बळी

महाराष्ट्र आणि तामिळनाडूनंतर देशात करोनाचा सर्वाधिक फैलाव दिल्लीत दिसून येत असल्याचे चित्र आहे. दिल्लीतील रुग्णांची आकडेवारी ३६ हजारांच्या पुढे गेली असून आत्तापर्यंत करोनामुळे १२१४ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत दोन हजारांहून अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दरम्यान देशातील करोना रुग्णांची संख्या आज ३ लाखांवर गेली असून गेल्या २४ तासांत एका दिवसात सर्वाधिक ११, ४५८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३८६ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशात एकूण ८८८४ जणांचा करोनाने आतापर्यंत बळी घेतला आहे.
दरम्यान देशात करोना रुग्णांचा १ लाखाचा टप्पा ओलांडण्यासाठी ६४ दिवस लागले. त्यानंतर पुढच्या दोन आठवड्यात ही संख्या २ लाख झाली. यानंतर गेल्या १० दिवसांत देशात करोना रुग्णांची एकूण संख्या ३ लाखांवर गेली असून देशातील रुग्णांची संख्या ३, ०८, ९९३ इतकी झाली आहे. देशात सध्या १४५७७९ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर १५४३३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ४९.९ टक्क्यांवर गेले आहे. तर देशातील करोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा १५.४ दिवसांवरून १७.४ दिवसांवर गेला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
गेल्या २४ तासांत ३८६ जणांचा मृत्यू झाला आहे. या पैकी दिल्लीत १२९ तर महाराष्ट्रात १२७ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. दिल्ली शुक्रवारी पहिल्यांदा २००० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या वाढून १ लाखांवर गेली आहे. गुजरातमध्ये ३०, उत्तर प्रदेशात २०, तामिळनाडूत १८, पश्चिम बंगाल, तेलंगण आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी ९, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ७, हरयाणा आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी ६, पंजाबमध्ये ४, आसाम २, केरळ, जम्मू-काश्मीर आणि ओडिशामध्ये प्रत्येक एकाचा करोनाने मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशात करोना मृतांची एकूण संख्या ८० झालीय. कर्नाटक ७९, हरयाणात ७० आणि पंजाबमध्ये एकूण ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ५३ , बिहारमध्ये ३६, उत्तराखंडमध्ये २१, केरळ १९, ओडिशा १० तर झारखंड आणि आसाममध्ये आतापर्यंत प्रत्येकी एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे.