MaharashtraCoronaUpdate : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाखावर , मुंबईत आज सर्वाधिक ९० मृत्यूची नोंद

राज्यात आज ३ हजार ४९३ नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १४१ झाली आहे. तर आज १२७ रुग्ण दगावल्याने राज्यातील करोनाने दगावलेल्यांची संख्या ३ हजार ७१७ झाली आहे. तर मुंबईत आज सर्वाधिक ९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज १ हजार ७१८ रुग्ण बरे झाल्याने करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४७ हजार ७९६ झाली आहे.
आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज ३ हजार ४९३ रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या १ लाख १ हजार १४१ झाली असली तरी आतापर्यंत ४७ हजार ७९६ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेल्याने राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४९ हजार ६१६ एवढीच असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान राज्यात आज १२७ रुग्ण दगावले असून त्यात सर्वाधिक मृतांची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईत आज ९०, ठाण्यात ११, कल्याण-डोंबिवलीत ३, वसई-विरार, मिरा-भायंदर, धुळे आणि अमरावतीत प्रत्येकी एक, नाशिक आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी दोन, सांगलीत ३ आणि पुण्यात १२ रुग्ण दगावले आहेत. आज दगावलेल्यांमध्ये ९२ पुरुष आणि ३५ महिलांचा समावेश आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी ६७ रुग्ण ६० वर्षांवरील, ५२ रुग्ण हे ४० ते ५९ वयोगटातील आणि ८ रुग्ण ४० वर्षाखालील आहेत. तर ८९ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोगासह इतर आजार होते, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.