CoronaIndiaNewsUpdate : काळजीचे कारण नाही , भारताचा मृत्यू दर अत्यल्प तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४९.२१ टक्के वर : केंद्र सरकार

Result of Population based serosurvey in districts:(Part 1)🔽#Lockdown/containment has been successful in keeping it low & preventing rapid spread: DG, @ICMRDELHI , @ProfBhargava pic.twitter.com/BMfjDz1agm
— PIB India (@PIB_India) June 11, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट वाढून ४९.२१ वर पोहचला आहे. दरम्यान देशात सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. देशात आत्तापर्यंत केवळ ०.७३ टक्के लोकसंख्या अर्थात एका टक्क्यापेक्षाही कमी जनसंख्येला कोरोना संसर्ग झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे, कोविड १९ मुळे झालेला भारतातील मृत्यूदर हा जगातील सर्वात कमी मृत्यूदर ठरला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक प्रो. बलराम भार्गव यांनी ही माहिती दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेसाठी २८,५९५ घरांचा दौरा करण्यात आला तसंच २६,४०० लोकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. या सर्व्हेच्या अहवालानुसार, लॉकडाऊन यशस्वी होत असताना दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर खूपच कमी आहे. परंतु, अजूनही मास्क वापरणं, वारंवार हात धुणं आणि सोशल डिस्टन्सिंग कायम राखणं गरजेचं आहे. लॉकडाऊनमुळे करोनाचं संक्रमण वेळीच नियंत्रणात आणता आलं. २४ हजार जणांवर हा सर्व्हे घेण्यात आल्याचंही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तर भारतासारख्या मोठ्या देशात करोनाचं संक्रमणाचं प्रमाण खूपच कमी आहे. भारत अजूनही समूह संसर्गाच्या (कम्युनिटी ट्रान्समिशन) स्थिती पोहचलेला नाही, असे आयसीएमआरचे महासंचालक भार्गव यांनी पुढे म्हटले आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सध्या १ लाख ३७ हजार ४४८ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर तब्बल १ लाख ४१ हजार ०२८ जणांनी करोनावर मात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २ लाख ८६ हजार ५७९ असून यातील ८१०२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.