#MumbaiCoronaUpdate : मुंबईतील कोरोना रुग्णांसाठी असलेले बेड्स फुल्ल झाल्याने महापालिकेची चिंता वाढली…

आतील रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच प्रशासनाची चिंताही वाढत आहे. कारण, करोना स्पेशल रुग्णालयांमधील बेडची क्षमता संपत आल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार मुंबई महापालिकेने बेड्सची परिस्थिती सांगितली आहे. कोविड रुग्णालयांमधील (तीव्र लक्षण असलेली रुग्ण) ६०९९ बेड्सपैकी ९६ टक्के बेड्स फुल्ल आहेत. तर मध्यम स्वरुपाची लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी असलेल्या कोविड आरोग्य केंद्रावरील १४३७ बेड्सपैकी ८० टक्के बेड व्यापले आहेत. विशेष म्हणजे ६४५ कोविड आयसीयू बेड्सपैकी ९९ टक्के बेड फुल्ल झाल्याचंही महापालिकेने सांगितलं आहे. दरम्यान, कोविड केअर सेंटर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती महापालिकेने दिली.
कोरोना रुग्ण वाढल्यानंतर मुंबईतील सील केलेल्या इमारतींचा आकडा ३०९७ वर पोहोचला आहे. तर शहरातील कंटेन्मेंट झोनचा आकडा ६७४ वरुन ६९६ वर गेला. दरम्यान संपूर्ण राज्यातच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असल्याचा दावा आरोग्य विभाग करीत असून आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गुरुवारी ६९८ जणांनी करोनावर मात केली. गुरुवारी मुंबईशिवाय इतर ठिकाणीही मृत्यू झाले. यामध्ये वसई-विरार आणि ठाण्यात प्रत्येकी दोन, तर नवी मुंबईत एका रुग्णाने प्राण गमावले. शिवाय नांदेड, जळगाव आणि रायगडमध्येही प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.
दरम्यान अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांसाठीही दिलासादाक बातमी आहे. बेस्ट कर्मचारी बरे होण्याचा दर दोन आठवड्यांपूर्वी २६ टक्के होता, जो आता ५२ टक्क्यांवर आला आहे. बेस्टमध्ये आतापर्यंत एकूण २५० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. तर महापालिकेच्याही १५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी याबाबतची माहिती नुकतीच दिली होती.